नाशिक: आम्ही शेतीबाबत निर्णय घेतल्यामुळे देशातील शेती उत्पादन वाढले होते. परंतु आज काय परिस्थिती आहे. नवीन कारखानदारी आली नाही. शेती संकटात म्हणजे देशाची आर्थिक स्थिती संकटात येते. शेतकर्यांची क्रयशक्ती वाढली तर अर्थव्यवस्थेला मदत होते. शेतकर्यांची खरेदी करण्याची ताकद नसेल तर उद्योग, कारखाने संकटात येतात. तेच चित्र आज पहायला मिळत आहे कारण या सरकारला शेतकर्यांविषयी आस्था नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मोदींना घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निफाडच्या जाहीर सभेत पवार यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकर्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकर्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकर्यांना संकटात आणण्याचे पाप भाजपा सरकारने केल्याची टीकाही पवार यांनी केली. व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्यांना की हा गडी आपला नाही हा कुणाचाच नाही शेतकर्यांचा नाही व्यापार्यांचा नाही उद्योगधंद्यातील लोकांचा नाही बेकारी वाढली हे केंद्र सरकारने जाहीर केले त्यामुळे नव्या पिढीचाही नाही मग देश कुणासाठी द्यायचा यांच्या हातात. यांच्या हातात देश दयायचा म्हणजे मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे घटक आहेत त्यांच्या हातात देश देण्यासारखे आहे असेही शरद पवार म्हणाले.