मोदींनी देशाशी गद्दारी केली-अण्णा हजारे

0

राळेगणसिद्धी: अण्णा हजारे यांनी केलेल्या लोकपालच्या आंदोलनामुळेच आघाडीची सत्ता गेली. मोदी सरकार सत्तेवर येण्यास अण्णांचे आंदोलन महत्त्वाचे होते. मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदी सरकावर थेट तोफ डागली आहे. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरुन बोलत होते. मात्र आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असे असे अण्णा हजारे म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र आज पाच वर्ष होऊनही त्यांना अद्याप लोकपाल नेमता आलेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.