मोदींनी पवार कुटुंबियांची काळजी करू नये: शरद पवार

0

कोल्हापूर-काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील पहिली सभा वर्धा येथे घेतली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर सडकून टीका केली. दरम्यान मोदींच्या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये, पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा टोला शरद पवार यांनी कोल्हापूर येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात पवार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस कोणा एकट्या-दुकट्याची नाही. राज्यातील आणि देशातील लक्षावधी कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. हे सारेजण पक्षाची काळजी वाहण्यास तत्पर असल्याने मोदींनी काळजी करू नये. माझ्यावर पंचगंगेच्या पाण्यात वाढलेल्या आईचे संस्कार आहेत. गांधी घराण्याने देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर आकसाने टीका करणाऱ्या मोदी यांच्याकडून फारशा अपेक्षा करू नयेत, असा सल्ला देऊन पवार यांनी महाडिक व शेट्टी यांच्या पाठीशी राखण्याचे आवाहन केले.

निवडणुका संपल्यावर शरद पवार यांना दिल्लीतून बेघर व्हावे लागेल, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील उभय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाचे १६ खासदार निवडून येणार आहेत. मोदी यांना सत्तेवरून खेचण्याची ताकद शरद पवार यांची असल्याने त्यांना भाजपा बदनाम करत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या घराची चिंता करण्यापेक्षा आपले घर सांभाळले तरी पुष्कळ झाले, असा टोला त्यांनी लगावला.