पीएनबी घोटाळा : मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरुच!
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरुच आहे. शुक्रवारीही ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने मोदीची 44 कोटींची मालमत्ता गोठवली. 30 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स, स्टीलची 176 कपाटे, विदेशी घड्याळांनी भरलेली 60 प्लास्टिक खोकी, 13.86 कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. दुसरीकडे, मोदीला पैसे परत करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. पैसे परत करण्यासाठी काही ठोस प्लॅन असेल तर पुढे या, भरपाई द्या असे बँकेने म्हटले आहे. मात्र मोदीने किती रक्कम परत करावी आणि त्यासाठी टाइमलाइन काय आहे याचा उल्लेख ई-मेलमध्ये केलेला नाही. ‘पीएनबी’च्या महाव्यवस्थापक (विदेश बँकिंग विभाग) अश्विनी वटस् यांनी मोदीला ई-मेल पाठविला आहे. तीनच दिवसांपूर्वी मोदीने ‘एक दमडीही परत करणार नाही. बँकेने माझी बदनामी केली. माझा व्यवसाय बुडाला’ अशी बोंब मारली होती.
छापेमारी, जप्तीची कारवाई सुरुच!
गेल्या आठवड्याभरापासून हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंधित विविध ठिकाणांवर आम्ही छापेमारी करतो आहोत. 158 पेट्याही आम्ही ताब्यात घेतल्या आहेत. गुरुवारीच अंमलबजावणी संचलनालयाने नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीच्या नऊ आलिशान कार जप्त केल्या होत्या. तसेच 7.80 कोटीचे म्युचअल फंडही गोठवले आहेत. जप्त करण्यात आलेल्या कार्समध्ये रोल्स रॉयसचाही समावेश आहे. या कारची किंमत 6 कोटी रुपये आहे. तसेच रोल्स रॉईस घोस्ट, मर्सडिझ बेंझ जीएल 350, पोर्शे पनामेरा, टोयोटा फॉर्च्युनर, टोयटो इनोव्हा आणि 3 होंडा कार्सचा समावेश आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकार्यांनी दिली आहे. मोदीसोबतच मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित 86.72 कोटींचे शेअर्स आणि म्युचअल फंड गोठवण्यात आले आहेत. सीबीआय आणि ईडी यांच्याकडून घोटाळा प्रकरणात छापेमारी आणि जप्तीची कारवाई सुरुच असून, मोदीच्या फायर स्टार डायमंड या कंपनीच्या पाच अधिकार्यांना अटक करण्यात आली असून, त्यांचीही कसून चौकशी सुरु होती.
अखेर अर्थमंत्रालयाला आली जाग!
मोदीने ठकवल्यानंतर अर्थमंत्रालय खडबडून जागे झाले आहे. बँकांनी द्यावयाच्या कर्जांसंबंधीच्या नियमांमध्ये बदल करावेत, असे आदेश अर्थमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. हा घोटाळा उघड झाल्यानंतर असे आणखी कोणते गैरव्यवहार झाले आहेत का ते तपासून पाहण्याच्या लेखी सूचना मंत्रालयाने चार भारतीय बँकांच्या हाँगकाँगमधील शाखांना केल्या आहेत. एसबीआय, अॅक्सिस बँक, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकांना पीएनबीच्या मुंबईतल्या शाखेतून लेटर ऑफ अंडरटेकिंग दिले गेले होते. ज्या कारणासाठी कर्ज दिले त्याच कामासाठी पैसे खर्च होताहेत वा नाही हे पाहण्याचे काम बँकांना करावे लागणार आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
काय आहे ई-मेलमध्ये…
– ‘पीएनबी’तील काही अधिकार्यांनी बेकायदेशीररीत्या आपल्याला लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिले, मात्र आमच्या बँकेने आपल्याला आणि आपल्या तीन पार्टनर फर्मला अशी कोणतीही सुविधा दिली नव्हती.
– आपण बँकेचे पैसे परत केलेले नाहीत. त्यामुळे आम्हाला तपास यंत्रणांना माहिती द्यावी लागली.
– आपल्या बेकायदेशीर कृत्यामुळे फेमा आणि मनी लाँडरिंगविरोधी कायद्याचा भंग झाला आहे.
– आपण पैसे परत करावेत. त्यासाठी ठोस योजना असल्यास ती बँकेला सादर करावी. ई-मेलद्वारे बँकेशी संपर्क करावा.