मोदीची 523 कोटींची संपत्ती जप्त

0

ईडीचे छापे सुरुच : मोदी समूहाच्या 21 मालमत्ता हस्तगत

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा करणार्‍या आरोपी नीरव मोदीभोवतीचा कारवाईचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. ईडीने मनीलॉण्ड्रिंगविरोधी कायदा (पीएमएलए) अंतर्गत मोदी समूहाच्या 21 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात फ्लॅट आणि फार्महाऊसचा समावेश आहे. या जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 523 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. ईडीकडून मोदीच्या कार्यालयांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. एका खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी एका गोदामावरदेखील छापा घालण्यात आला होता. यात महागडी घड्याळे ईडीच्या हाती लागली होती. सुमारे 10 हजारांच्या आसपास घड्याळे या गोदामात होती. ती 176 स्टीलची कपाटे, 158 डबे आणि 60 प्लास्टिकच्या बॉक्समध्ये भरून ठेवली होती. नीरव मोदीच्या बँक खात्यांमधून 30 कोटी रुपये सील करण्यात आले आहेत. यासोबतच 13.86 कोटी रुपयांचे शेअर्सची सील गोठवण्यात आले आहेत. यापूर्वी मोदीच्या 9 आलिशान गाड्या ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने अलिबागमधील 27 एकरांमध्ये बनलेल्या मोदीच्या आलिशान फार्महाऊसचीदेखील झडती घेतली होती.

चोक्सी म्हणतो, मला या प्रकरणात गोवले!
पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 400 कोटींच्या घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या मेहुल चोक्सीने कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रातून सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या नशिबात जे आहे, ते होईल. पण मी काहीही चुकीचे केलेले नाही. मला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. सत्य लवकरच समोर येईल, असा कांगावा चोक्सीने केला आहे. चोक्सी हा पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचा मामा आहे. हे दोघेही व्यावसायिक भागीदार असल्याने या घोटाळ्यात चोक्सीला सहआरोपी करण्यात आले आहे.

अन्यायी पद्धतीने कारवाई सुरू आहे!
सक्तवसुली संचलनालयाने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर कारवाई सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मेहुल चोक्सीने त्याच्या कंपनीच्या साडेतीन हजार कर्मचार्‍यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. चोक्सीचे वकील संजय अ‍ॅबॉट यांनी हे पत्र सार्वजनिक केले आहे. या पत्रात चोक्सीने सरकार आणि तपासयंत्रणांवर टीका केली आहे. पत्रात चोक्सीने म्हटले आहे की, सरकारी तपासयंत्रणा चूकीच्या पद्धतीने काम करत असल्याने मला खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी मोठा अनर्थ ओढवल्यासारखे वातावरण तपासयंत्रणांनी निर्माण केले आहे. अन्यायी पद्धतीने कारवाई सुरू आहे. त्यामुळे मला काम करणेही अशक्य होऊन बसले आहे. सर्व ठप्प झाल्याने कर्मचार्‍यांनी इतरत्र नोकर्‍या शोधाव्यात. सरकारने माझ्या मालमत्ता आणि बँक खाती सील केल्याने मी तुमची देणी देण्यास असमर्थ आहे. देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल कर्मचारी वापरू शकतात. गरज पडल्यास सर्वांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर सर्व कर्मचार्‍यांची थकीत देणी दिली जातील, असेही त्याने पत्रात म्हटले आहे.