तो अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नाही ना?
सोलापूर-राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) वर्ष २०१७-१८ च्या रोजगार आणि बेरोजगारीचे वार्षिक सर्वेक्षण रोखल्याचा विरोध करत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) प्रभारी प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यानेही पद सोडले आहे. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. ‘अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना?’, असा सवाल मुंडे यांनी ट्विटवरुन केला आहे.
वर्षाला २ कोटी रोजगार देणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींनी रोजगार अहवाल का रोखला? नोकरीच्या संधी घटल्याचे पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना? मोदीजी तुम्ही किती दडपशाही करणार? अहो, कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही. #ModiGoBackhttps://t.co/6YJxiRiAjB
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 30, 2019
सांख्यिकीतज्ज्ञ पी. सी. मोहनन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक जे.व्ही.मीनाक्षी यांना जून २०१७ मध्ये एनएससीच्या सदस्यपदी नियुक्त केले होते. दोघांनाही तीन वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता. एनएसएसओच्या अहवालाला उशीर होत असल्यामुळे दोघांनी कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे.
हा अहवाला मोदींनी का रोखला असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ‘वर्षाला २ कोटी रोजगार देणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींनी रोजगार अहवाल का रोखला? नोकरीच्या संधी घटल्याचे पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना? मोदीजी तुम्ही किती दडपशाही करणार?’ तसेच पुढे त्यांनी ‘कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही.’असा टोला धनंजय मुंडे यांनी मोदींना लगावला आहे.
दरम्यान राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेमार्फत प्रसिद्ध होणारा हा मोदी सरकारचा पहिला अहवाल होता. नोटाबंदीनंतर नोकरीच्या संधी कमी झाल्याची आकडेवारी या अहवालात समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.