मोदीशेठ, काळा पैसा गेला कुठे?

0

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेले 15.40 लाख कोटी रुपयांचे चलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका झटक्यात रद्द केले. त्याचे दुष्परिणाम हा देश आजही भोगते आहे, पुढील काही दशके तो भोगावाही लागणार आहे. परंतु, काळा पैसा हुडकून काढण्यासाठी अगदी अविचाराने घेतलेला हा निर्णय पाहता, तो काळा पैसा तरी मोदीशेठ यांना सापडला का? जेवढे चलन रद्द केले होते तेवढे चलन पुन्हा बँकांत आले आहे, मग हा काळा पैसा गेला कुठे?

अख्ख्या देशाला वेठीस धरले गेले आहे. प्रचंड चलन तुटवडा निर्माण झाला असून, खिशात असलेल्या कोणत्याच नोटांबद्दल कुणालाच खात्री वाटेनाशी झाली आहे. आज ज्यांच्या हातात दोन हजार, पाचशेची नोट आहे ती उद्या चलनात राहील किंवा नाही, याबद्दल प्रत्येकाला धास्ती वाटते. त्यामुळे कुणीही चलनातील नोटांवर विश्‍वास ठेवायला तयार नाही. चलनबंदीचे सर्वाधिक दुष्परिणाम 40 टक्के ग्रामीण जनता भोगत असून, त्यांच्या त्रासाला पारावार उरलेला नाही. नोटाबंदीविरोधात बोलले तर देशद्रोही ठरवले जात असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागण्याची वेळ लोकांवर आली. एवढा सारा खटाटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या उद्देशाने केला होता, तो उद्देश तरी सफल झाला आहे का? या नोटाबंदीच्या त्राग्यातून मोदीशेठने काय साध्य करावयाचे होते ते केले का? तर या प्रश्‍नाचे उत्तर अजिबात नाही असेच आहे. नोटाबंदीनंतरच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांकडे जवळपास 15 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वर्तवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या 15 लाख 40 हजार कोटींच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. आता यातील 15 लाख कोटी रुपये परत आल्याने काळा पैसा नेमका गेला कुठे? हा पैसा मिळाला नसेल तर मोदीशेठ सपशेल अपयशी ठरले असून, त्यांनी लोकांना त्राहीमाम करून नेमके काय साध्य केले? जे सव्वाशे माणसे हकनाक मेलीत, जे शेतकरी, छोटे व्यापारी, मजूर, कामगार देशोधडीला लागलेत, त्याचे पाप मोदीशेठ कुठे फेडणार आहेत? या देशाला विद्वान पंतप्रधानांची परंपरा आहे. परंतु, अक्कलशून्य निर्णय घेणारा पंतप्रधान हा देश पहिल्यांदाच पाहतो आहे. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे आवाहन मोदींनी केले होते. या आवाहनानंतर लोकांनी बँकांमध्ये रांगा लावत त्यांच्याकडे असणार्‍या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा जमा केल्या. 30 डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये 15 लाख कोटी रुपयांच्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा जमा झाल्याच आहेत, तर अद्याप 40 हजार कोटी रुपये काही लोकांकडे आहेत, ते पैसे घोषणा करूनही आरबीआय स्वीकारण्यास तयार नाही. वास्तविक पाहता, 30 डिसेंबरनंतर जुन्या नोटा थेट आरबीआयमध्ये भरता येईल, असे मोदी यांनीच जाहीर केले होते. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून पलटी मारली असून, केवळ विदेशी नागरिकांच्याच जुन्या नोटा स्वीकारू अशी भूमिका घेऊन आरबीआयने अनेकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आणि त्यांच्या हक्काचा पैसा चलनातून बदलून न देण्याचा किळसवाणा प्रकार चालवला आहे. त्याबद्दल देशात ठिकठिकाणी आंदोलनेही होत आहेत. ही आंदोलने मोदीशेठ यांच्यासाठी भूषणावह नक्कीच नाहीत.

नोटाबंदीनंतरच्या 50 दिवसांत देशात सर्व काही सुरळीत होईल, अशी घोषणाच मोदी यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले? देशातील आर्थिक आणीबाणी अद्यापही संपलेली नाही. चलनकल्लोळाची तीव्रता आजही कायम आहे. एटीएम आणि बँकांमध्ये पुरेसे चलन नसल्याने लोकं हतबल आणि व्यापार-उदिम प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरीवर्गाच्या हालअपेष्टेला तर कुणी विचारतही नाही, कारण कायम दुर्लक्षित असलेल्या या घटकाला पैसा लागू शकतो, याबद्दल तर कुणीही विचार करण्यास तयार नाहीत. या देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून, ती निवळण्यासाठी उपाययोजना करण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. सर्वांचा विचार आणि सर्वांचे कल्याण याबद्दल या सरकारला काहीही सोयरसुतक नसल्याचे जाणवते आणि ही जाणीव या देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाणारी वाटते आहे. निवडणुका जिंकणे, सत्ता प्राप्त करणे आणि आपला हुकूमशाही अजेंडा राबवणे अशीच मोदीशेठ आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांची राजकीय रणनीती भासत आहे. भाजपचा नाझी झाला काय? याची काळजी आता आम्हाला वाटू लागली आहे. तसेही रा. स्व. संघाच्या द्वेषमूलक विखारी विचारातून भाजप हे अपत्य जन्माला आलेले आहे. त्यामुळे आता नाझी पक्षाच्याच वाटेवरून होत असलेली भाजपची वेगवान वाटचाल पाहता, कुणाला फारसे नवलही वाटणार नाही. नोटाबंदी हा या देशाचा काळाकुट्ट इतिहास ठरणार आहे. 15 लाख 40 हजार कोटींचे चलन एका झटक्यात रद्द केले, ते सर्व चलन पुन्हा बँकांत येत असेल, तर या देशातील मोदीशेठ म्हणतात तो काळा पैसा कुठे गेला? देशाला लुटणार्‍या चोरांनी या पैशाची पुरेपूर विल्हेवाट लावलीच आहे, उलटपक्षी हा काळापैसा आता पांढराही झाला आहे. त्यामुळे देशाला फायदा तर काही झालाच नाही, उलटपक्षी लोकांना अतोनात त्रात मात्र होत असून, देश दशकभर मागे गेला. इतका अविचारी पंतप्रधान आणि त्यांचे आर्थिक सल्लागार हा देश पहिल्यांदाच पाहतो आहे, हे या देशाचे मोठे दुर्देव आहे. नोटाबंदीच्या निमित्ताने मोदीशेठने चोरं सोडले अन् संन्याशीच फासावर लटकवत बसलेत! असे चित्र आहे.