मोदी, अमित शहांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. कॉंग्रेसने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मोदी, शहांकडून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठाने देव यांच्या याचिकेवर सुनावणी करणार असल्याचे म्हटले आहे. देव यांचे ज्येष्ठ वकील, अभिषेक मनु संघवी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून मोदी आणि अमित शहांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाकडून कुठलिही कारवाई होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आपल्या भाषणात सैन्यातील जवानांचा वापर करत आचारसंहिता भंग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

सुष्मिता देव यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून मोदी आणि अमित शहांवर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जाऊ शकतात. दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदी आणि अमित शहांबाबत तक्रार दिला होती. त्यामध्ये, मतांचे ध्रुवीकरण करणे, प्रचारात भारतीय सैन्यदलाच्या नावाचा उल्लेख करणे आणि मतदानादिवशीही सभांचे आयोजन करणे, या बाबींचा उल्लेख करत भाजपा नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे काँग्रसने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.