वाराणसी: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचे आधुनिक अवतार असून, जे काम औरंगजेब पूर्ण करू शकला नाही, ते काम आता मोदी करत आहेत’, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. निरुपम हे सद्ध्या वाराणसीत प्रचार करत आहे. जसजशी वाराणसीच्या निवडणूकीची तारीख जवळ येते आहे तसतसे राजकारण अधीक प्रमाणात तापत आहे . कालच प्रियांका गांधीं वढेरा यांनी मोदींची तुलना महाभारताचा खलनायक असणाऱ्या दुर्योधनाशी केली होती. आज संजय निरुपम यांनी पंतप्रधान यांना थेट औरंगजेबाचा आधुनिक अवतार म्हटलं आहे. मुघल बादशहा औरंगजेबाने वाराणसीवर हल्ला केला होता. वाराणसीतील अनेक मंदिरे त्याने पाडली होती. काशीच्या हिंदू नागरिकांवर त्याने जिझीयासारखा जाचक कर बसवला होता, असे सांगत निरुपम यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.
‘ मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. विकासाच्या नावाखाली त्यांनी काशीतील शेकडो मंदिरं पाडली आहेत. बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी ५५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. तसेच अनेक प्रकारचे फाइन बसवले आहेत. औरंगजेब जेव्हा काशीची मंदिरे तोडायला आला होता, तेव्हा येथील लोकांनी त्याला मंदिरं पाडू दिली नव्हती. पण आता मोदी हे हिंदू हिताच्या गोष्टी करतात आणि हिंदुस्थानवर राज्य करण्याच्या गोष्टी करणारे मोदी त्याची औरंगजेब ची कसर पूर्ण करत आहेत. त्याला जे करता आलं नाही ते मोदी करत आहेत. यासाठी मी आधुनिक औरंगजेब मोदींचा निषेध करतो’ अशा शब्दात निरुपम यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले.
एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी “चौकीदार चोर है” असा प्रचार करत आहेत. तर मोदींचा अहंकार भगवान कृष्णालाही बंधक बनवणाऱ्या दुर्योधनाच्या अहंकारासारखा आहे असं म्हणत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी या टीकेला कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.