कर्नाटकात राहुल गांधीची टीका
बेल्लारी । नरेंद्र मोदींचे शब्द पोकळ असतात. ते जे बोलतात ते करीत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान बेल्लारी येथे ते बोलत होते. खा. गांधी सध्या चार दिवसांच्या कर्नाटक दौर्यावर असून, या दरम्यान ते बेल्लारी, कोपल, रायचूर, गुलबर्गा आणि बदर येथे प्रचार सभा घेणार आहेत.
मोदींनी कंत्राट आपल्या मित्राला दिले
राफेल करारावर पुन्हा एकदा राहुल गांधी बोलले. मोदी सरकारने फ्रान्सच्या कंपनीकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली. त्यासाठी ते पॅरिसला गेले तिकडे जाऊन त्यांनी स्वतः याबाबतचा करार बदलला. त्यानंतर नुकतेच या कंपन्यांचे कंत्राट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला देण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी हे कंत्राट आपल्या मित्राला दिले, असा आरोप त्यांनी केला.
देशाच्या भविष्याबाबत ऐकण्यात रस
संसदेतील आपल्या एक तासाच्या लांबलचक भाषणात नरेंद्र मोदी देशाच्या भविष्याबाबत, तरुणांच्या रोजगाराबाबत किंवा शेतकर्यांना मदत करण्याबाबत काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला तास केवळ काँग्रेस पक्षावरील टीकेवर आणि भूतकाळातील गोष्टी सांगण्यातच घालवला. देशाला यात रस नाही, तर आपल्या पंतप्रधानाकडून देशाच्या भविष्याबाबत ऐकण्यात रस आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सोनियाजी, आम्ही आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. सोनिया गांधींना ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही त्यांना मदत केली, त्यांचा स्विकार केला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला संधी द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी उपस्थितांना केले.