अमरोहा: पूर्वी सातत्याने दहशतवादी हल्ले व्हायचे. त्यामुळे सर्वच यंत्रणांना सतर्क रहावे लागायचे. आम्ही सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले थांबले आहेत. कारण एक जरी चूक झाली तर देशाचे चौकीदार मोदी पाताळात घुसून ठार मारतील अशी अतिरेक्यांना भीती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पाकिस्तानात घुसून आम्ही अतिरेक्यांचा खात्मा करतो. ते पाहून काही लोकांना रडू येते. हे लोक पाकची बाजू घेतात, पाकिस्तानात हिरो बनण्याचा प्रयत्न करतात, असे सांगतानाच पूर्वी उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाची सत्ता होती. दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा काय होत होते? कधी लखनऊमध्ये स्फोट होत होते, कधी अयोध्येत स्फोट होत होते, तर कधी काशी, कधी रामपूरमध्ये हल्ले व्हायचे. देशाच्या यंत्रणा प्रचंड मेहनतीनंतर या अतिरेक्यांना पकडायच्या. मात्र राजकारणासाठी या आरोपींना सोडले जायचे, अशी टीका त्यांनी केली.