शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात या आठवडयात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन्ही देशांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असली तरी पाकिस्तान मात्र या भेटीमुळे टेन्शनमध्ये आला आहे. मोदी-जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानची हीच अस्वस्थतता लक्षात घेऊन चीनने त्यांना आश्वस्त केले आहे. आमच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधात कुठलाही फरक पडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध पूर्वी होते तसेच दृढ राहतील असे चीनने म्हटले आहे.
दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार
मागच्या वर्षभरात भारत-चीनसंबंध मोठया प्रमाणावर खराब झाले आहेत. दोन्ही देशांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या फौजा आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर तिबेटी अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुनही चीनने आगपाखड केली होती. या सर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौर्यावर जात असून ते शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. 27 आणि 28 एप्रिल रोजी अनौपचारिक उच्चस्तरीय बैठकीत मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आमचा पाकिस्तानला पाठिंबा राहिल असे वँग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांना म्हटले आहे.