मोदी सरकारकडून राज्यघटनेची पायमल्ली – डॉ.आबनावे

0

पुणे : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली भारतीय संविधान ही सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. मात्र, संपूर्ण देश भगवा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोदी सरकारकडून भारतीय संविधानाचे पालन होत नाही. स्वायत्त संस्थांवर मर्जीतील माणसांची नेमणूक करून संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवाद्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संविधानाचा अनादर करणाऱ्यांना आपण हटविणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत पुरोगामी विचारवंत आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्विनी संस्था आणि आरके फाऊंडेशन आयोजित संविधान जागरण परिषदेत डॉ. आबनावे ‘विधी विधान से संविधान तक’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कोरेगाव पार्क येथील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात झालेल्या या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, आरके फाऊंडेशनच्या अध्यक्ष आरती सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, ऍड. राहील मलिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “सध्याचे सरकार दलित-मुस्लिमांच्या भावनांशी खेळत आहे. केवळ घोषणाबाजी आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचा योग्य वापर करीत आगामी काळात चांगली माणसे सत्तेवर बसविणे आपली जबाबदारी आहे.

संविधानाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे असे आवाहन रतनलाल सोनग्रा यांनी केले.भगवान वैराट यांनी आपले मनोगत मांडले. आरती सोनग्रा यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले आणि अलका जोशी यांनी आभार मानले.