मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे प्रमुख कारण  – हरिश्‍चंद्र गडसिंग 

0
तळेगाव दाभाडे : भारतामध्ये 70 टक्के अपघात हे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होतात तर उर्वरित अपघात मानवी चुकामुळे होतात. मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे मागील चार-पाच वर्षांत अपघात वाढण्याचे मोठे कारण आहे, मत माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी हरिशचंद्र गडसिंग यांनी व्यक्त केले. आंबी (ता. मावळ) येथे मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय (वाहतूक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव व परिसरात अवजड वाहतूक करणारे चालक मालक यांच्या करिता वाहतुकीच्या नियमांचे पालन व अपघात विरहित वाहतुकीसाठी करण्यात उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी गडसिंग बोलत होते.
त्या वाहनाचालकांवर गुन्हे दाखल करू
यावेळी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक हगवणे, मोटार वाहन निरीक्षक रूपेश गायकवाड, मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे उपाध्यक्ष सागर पवार, सचिव श्रीकांत  उद्योजक किरण काकडे, सुधाकर शेळके, संदीप काळोखे, सतीश कलावडे व वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वाहतुकीचे नियम समजावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अन्यथा त्या चालकावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करू असे ठणकावून सांगितले. पोलीस निरीक्षक राजमाने यांनी चालकांचे वाहन परवाने व इतर कागदपत्रांची तपासणी होणार असल्याचे सांगत अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक रामदास काकडे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार विक्रम काकडे यांनी केले तर आभार मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलासराव काळोखे यांनी मानले.