मोबाईल चोरटे धुळे पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ/धुळे : गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील तालुका पोलिसांनी दोघा मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून 94 हजार रुपये किंमतीचे 15 मोबाईल जप्त केले असून एका साथीदाराचा शोध सुरु आहे. समाधान उर्फ दादू दत्तात्रय पाटील व गोपाळ रत्नाकर पाटील (19, दोन्ही रा.बाळापूर) अशी अटकेतील संशयीताची नावे आहेत तर अमित सुभाष घोडेस्वार तिघे (रा.बाळापूर) हा पसार झाला आहे.

काऊंटरवर मोबाईल ठेवताच लांबवला
धुळे तालुक्यातील मांडळ येथील राहिवासी नंदलाल भावराव पाटील हे सोमवार, 14 रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील फागणे गाव शिवारातील छाजेड पेट्रोल पंपाजवळील श्रीराम टी स्टॉल येथे चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांनी त्यांचा मोबाईल टेबलावर ठेवला होता. चहा प्यायल्यानंतर ते चहाचे पैसे देण्यासाठी काउंटरवर गेले असता 20 ते 30 वयोगटातील तिघां मुलांनी 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला होता. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केली कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारे तालुका पेालिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील सहा.निरीक्षक भूषण कोते, प्रवीण पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, भूषण पाटील, दिनेश देवरे, राजेंद्र मोरे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.