मोबाईल चोरट्यांना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

0

जळगाव । नवीपेठे परिसरातून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पोबारा केल्याप्रकरणी सोमवारी न्यायाधीश कांबळे यांच्या न्यायालयात दोन संशयितांना हजर करण्यात आले असता त्यांना 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोल्हेनगर येथील रहिवाशी श्रीराम यशवंत पाटील हे 28 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 7.15 वाजता नवीपेठ परिसरातील पाटणकर दुकानाजवळ जात असतांना विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातून 21 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल होता.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने राज अरविंद सोनार या संशयितास अटक केली होती. त्यानंतर त्याची 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. यातच रविवारी शहर पोलिस ठाण्याचे प्रितमसिंग पाटील, बळीराम तायडे, दिपक सोनवणे, विजयसिंग पाटील, रतन गिते अशांनी भुसावळ गाठून दुसरा सशंयित चोरटा पुष्पक गोपाळ भंगाळे याला अटक केली. सोमवारी राज सोनार याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे आज राज सोनार व पुष्पक भंगाळे या दोन्ही मोबाईल चोरट्यांना न्यायाधीश कांबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मोबाईल चोरी प्रकरणावर न्यायालयात कामकाज होवून दोघांना न्या. कांबळे यांनी 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयितांकडून मोबाईलही हस्तगत करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसात शहर परिसरात झालेल्या मोबाईल चोरी प्रकरणी याचा हात आहे का? यादृष्टीने तपास सुरू आहे.