मोबाईल टॉवर्स प्राधिकरणाकडे स्थलांतरीत करावेत

0

जागरुक नागरिक संघटनेची मागणी

आकुर्डी : मोबाईल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आरोग्याला धोका पोहोचत आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत नागरी वस्तीत असे अनेक मोबाईल टॉवर्स आहेत. आरोग्यासाठी धोकादायाक ठरणारे हे टॉवर्स मोकळ्या जागेत स्थलांतरीत करा, अशी मागणी जागरुक नागरिक संघटनेने प्राधिकरणाकडे केली आहे. या संदर्भात संघटनेचे डॉ. सुरेश बेरी, मनोहर पद्मन, अर्जुन सावंत, जगन्नाथ वैद्य, एकनाथ पाठक, गोकुळ बंगाळ यांच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

सर्व टॉवर्स अनधिकृत
या निवेदनात म्हटले आहे की, प्राधिकरण परिसरात उभे असलेले सर्व टॉवर्स अनधिकृत असून ते रहिवासी इमारतींवर आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार शाळा, रहिवासी इमारती व रूग्णालयांजवळ मोबाईल टॉवर्स उभे करू नयेत. मात्र, त्याचे प्राधिकरणात कुठेही पालन होत नाही. न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मिळालेली आहे. नंतर ही स्थगिती उठविण्यासाठी गेल्या 4 वर्षात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकला नाही. ज्या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे. त्या ठिकाणचे टॉवर्स खासगी जागेवरून हलवून ते मोकळ्या जागी किंवा सरकारी इमारतींवर हलवावेत. टॉवर परिसरातील सर्व नागरिकांची कॅन्सर, हृदयविकार व अन्य आजारांबाबत महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत पाहणी करून एक अहवाल तयार करावा. टॉवरच्या रेडिएशनची तीव्रता मोजण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारावी. याबाबत एक समिती स्थापन करून त्यावर नागरिकांचे प्रतिनिधी घ्यावेत. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न करावेत.