मोरवाडी आयटीआयतील 33 विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार

1

शैक्षणिक सामंजस्य कराराव्दारे ‘करिअर डे’मधून 33 विद्यार्थ्यांची निवड
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय येथील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या ’करिअर डे’ मधून 33 विद्यार्थ्यांना टोयोटा कंपनीत ‘टेक्निशियन’ म्हणून रोजगार मिळाला आहे. मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे.

दोन आयटीआयची स्थापना
महापालिकेने 1992 मध्ये मोरवाडी आयटीआयची तर 2006 मध्ये मुलींसाठी कासारवाडी आयटीआयची स्थापना केली. ज्यावेळी आयटीआय सुरु झाले तेव्हा तीन ते चार ट्रेड शिकविण्यात येत. त्यावेळी आस्थापना खर्च, कच्चा माल, साहित्य खर्च कमी होता. तथापि, मोरवाडी आयटीआयमध्ये आजमितीला 14 ट्रेड शिकविले जात आहेत. 14 ट्रेडच्या 36 तुकड्यांमध्ये 806 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयमध्ये सहा ट्रेडच्या सहा तुकड्यांमध्ये 151 विद्यार्थीनी शिकत आहेत.

वर्षअखेरीस ‘करीअर डे’
महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे आयटीआयचे प्रशिक्षण दिले जाते. या आयटीआय मधील मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार वर्षाच्या अखेरीस मेकॅनिकल मोटार व्हेईकल व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम राबविला जातो. या प्रोग्रॅम अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांसाठी करिअर डे चे आयोजन करण्यात आले होते.

परिक्षेपुर्वीच सर्वांनाच मिळाला रोजगार
शरयू टोयोटा, के कोठारी टोयोटा, शॉ टोयोटा वाघोली, राजयोग टोयोटा लातूर यांच्यामार्फत करिअर डे च्या दिवशी विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये बॅच ए मधील 14 पैकी 14, बॅच बी मधील देखील 19 पैकी 19 अशा 33 विद्यार्थ्यांना टेक्निशनयन म्हणून रोजगार मिळाला आहे. 100 टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. अंतिम परिक्षा होण्यापूर्वीच रोजगार मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले. गट निदेशक सुनील मोरे यांनी आभार मानले. बॅच ए व बीचे निदेशक सुनील पाटील, तानाजी कोकणे यांनी आयोजनामध्ये सहभाग घेतला. समन्वयक म्हणून गट निदेशक विजय आगम यांनी काम पाहिले.