मोरवाडी चौकात पीएमपी बस पेटली

0

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला

पिंपरी : निगडीवरून पुण्याच्या दिशेने जाणा-या पीएमपी बसने अचानक पेट घेतला. ही घटना महापालिका भवनासमोर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना बसमधून उतरवले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. लागलेल्या आगीत बस खाक झाली आहे.

प्रवासी वेळीच बाहेर
निगडीवरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस मोरवाडी चौक येथे आली असता, बसने अचानक पेट घेतला. वेळीच बसमधून प्रवासी बाहेर आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पिंपरी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. मात्र बसने तोपर्यंत पूर्णपणे पेट घेतला होता.

धूराचे लोट, वाहनांच्या रांगा
आगीचे व धुराचे लोट बसमधून बाहेर येत असल्याने परिसरात पूर्ण धूर पसरला. धुराचे लोट प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहने दिसणे कठीण होते. त्यामुळे निगडीवरून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली. वाहतूक ठप्प केल्याने पुण्याकडे जाणा-या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून या आगीत बस पूर्णतः जाळून खाक झाली आहे.