मोरव्हालच्या ग्रामस्थांवर हिवाळ्यात कोसळले जलसंकट

0

रावेर- तालुक्यातील आदिवासीबहुल मोरव्हाल येथे ट्यूबवेलचे पाणी गायब झाल्याने ग्रामस्थांवर ऐन हिवाळ्यात जलसंकट कोसळले आहे. तहसीलदारांसह गटविकास अधिकार्‍यांनी गावाची संयुक्त पाहणी करून पाण्याची समस्या मिटविण्यासाठी ट्यूबवेल किंवा विहिर अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत. आदिवासी भागातील मोरव्हाल हे दोन हजार वतीचे गाव असून गावाला पाणीपुरवठा करणारी ट्यूबवेल अचानक आटल्याने गावावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शुक्रवारी तहसीलदार विजयकुमार ढगे, गटविकास अधिकारी हबीब तडवी, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, ग्रामविकास सी.व्ही.चौधरी यांनी प्रत्यक्ष जागी भेट देऊन पाहणी केली. टंचाईग्रस्त गावाला तात्काळ पाणीपुरवठा पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले. टंचाईचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवणार असल्याचे तहसीलदार म्हणाले. मोरव्हाल येथील गावालगत शेतकर्‍यांकडून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी हबीब तडवी म्हणाले.