मोर्चाने शहरातील रस्ते व्यापले

0

नंदुरबार। येथील डी.आर.हायस्कूलचा विद्यार्थी राज ठाकरे याच्या निर्घुण हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची उच्चस्तरीय समितीकडून तपासणी केली जावी, हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करणार्यांना सहआरोपी करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामूकमोर्चात हजारो नागरिकांनी सहभागी होऊन सहवेदना प्रकट केल्या. या मोर्चाने शहरातील रस्ते व्यापून घेतले होते.डी.आर. हायस्कूलचा विद्यार्थी राज ठाकरे याची 8 जुलै रोजी गळाचिरुन हत्या झाल्याचे उघड झाले होते व पोलिसांनी त्याच रात्री दोन विद्यार्थ्यांना अटक केली होती. परंतु बाल गुन्हेविषयक न्यायालयासमोर त्या आरोपींना उभे केले असता, आरोपी अल्पवयीन असल्याच्या व अन्य कारणांच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही विद्यार्थ्यांची लगेचच जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावरून पूर्ण समाजमन ढवळून निघाले होते.

यांच्या होत्या स्वाक्षर्‍या
या निवेदनावर आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासूदेव गांगूर्डे, एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे अध्यक्ष जयकुमार पवार तसेच आदिवासी कोकणी समाज, एकलव्य संघटना, आदिवासी मौखिक साहित्यीक संघ, शेतकरी कामगार पक्ष, आदिवासी एकता परिषद, भिलिस्थान विकास मोर्चा, आदिवासी बचाव अभियानसह अनेक संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या मोर्चात नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.

मूकमोर्चाचे आयोजन
दरम्यान, आदिवासी महासंघ आणि विविध संघटनांनी पुढाकार घेत घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच न्याय मिळवण्यासाठी आज दि.20 जुलै रोजी या मूकमोर्चाचे आयोजन केले. शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यापासून सकाळी 11.30 नंतर निघालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. काळ्या फिती लावून व काळे झेंडे हातात घेऊन निषेध नोंदवण्यात आला. महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. शहरातील प्रमुख मार्गावरून भर उन्हात पायी चालत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिथे मोर्चाची समाप्ती करून शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले.

समितीकडून कसून चौकशी
आरोपींची उच्चस्तरीय समितीकडून कसून चौकशी केली जावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.उज्वल निकम यांची नेमणूक करावी, गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणार्यांना सहआरोपी करण्यात यावे, समाजात निर्माण झालेल्या असुरक्षीत भावनेला दूर करण्यासाठी जलदगतीने खटला चालवण्यात यावा, अशा मागण्या सर्व संघटना व नागरिकांच्यावतीने देण्यात आलेल्या या निवेदनात केल्या आहेत. दरम्यान, मयत राज ठाकरे या विद्यार्थ्याच्या इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, इश्‍वर ठाकूर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनीही मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला.