नंदुरबार । दरीत पडून मृत्युमुखी झालेला व्यक्ती आपल्या हद्दीतील रहिवासी नसल्याचे कारण पुढे करत त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी मोलगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्याची चौकशी होणार आहे. या विषयासंदर्भात जि.प. सदस्य रतन पाडवी यांनी जि.प.च्या स्थायी समिती सभेत तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनावडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत वैद्यकीय अधिकार्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
डॉक्टर धर्म पाळावा : नाईक
आम्हीही शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या आजारासंबंधी फोन करतो. त्याही वेळेस वैद्यकीय अधिकारी हद्दीकडे बोट दाखवीत असतात. वैद्यकीय अधिकार्यांनी हद्दीकडे बोट न दाखविता डॉक्टर धर्म पाळावा. जेणेकरून रुग्णांवर चांगले उपचार होऊ शकतील, असे जि.प. अध्यक्षा रजनी नाईक यांनी सभेत सांगत झाल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनावडे, उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीष सांगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती लता पाडवी, समाजकल्याण समिती सभापती आत्माराम बागले, आरोग्य व शिक्षण समिती सभापती हिराबाई पाडवी, बांधकाम सभापती दत्तू चौरे उपस्थित होते.
अत्यंत खेदजनक प्रकार
अक्कलकुवा तालुक्यातील खटासखाई येथील एका व्यक्तीचा दरीत पडून मृत्यू झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ओहवा, ता. अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. त्याठिकाणी शवविच्छेदन गृह नसल्याने मृतदेह मोलगी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा उपस्थित वैद्यकीय अधिकार्याने मयत व्यक्तीच्या मृतदेहावर शवविच्छेदनासाठी दोन दिवस लावले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.