पुणे-नाशिक महामार्गावर लागतात वाहनांच्या लांब रांगा
पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान मोशी टोलनाक्याच्या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. नाक्यावर धीम्या गतीने चालणार्या वाहतुकीमुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंत म्हणजे चिंबळी फाट्यापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत आहे. टोल नाक्यावरील वसुलीत होणार्या वेळेच्या अपव्ययाने रुग्णवाहिका, एसटी बस, पीएमपीएमएलच्या बसेस, कामगार, विद्यार्थी येथील कोंडीत अडकतात. या समस्येकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे.
हे देखील वाचा
पैसे घेण्यासाठी वेळ, वादावादी
टोलनाका ते चिंबळी फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी होण्याचे एकमेव कारण म्हणजे टोलनाक्यावरील वसुली-वादावादी यात एका-एका वाहनाला पुढे जाण्यासाठी लागणारा दीर्घकाळ यामुळे या कोंडीमध्ये सायंकाळी भर पडून एक ते दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागतात. सायंकाळी चाकण एमआयडीसीमधून वाहने सुटल्यानंतर सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत येथे हमखास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दररोज यावेळेत वाहतुकीची कोंडी होते. परिणामी, नागरिकांच्या वेळेचा आणि इंधनाचाही अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आहेत.