मोशी, पिंपरी उपबाजारात भाज्यांचे दर घटले; सर्वसामान्यांना दिलासा

0

पिंपरी-चिंचवड : काही दिवसांपूर्वी प्रचंड वाढलेले पालेभाज्यांचे दर आता पुन्हा आटोक्यात आले असून, यामुळे सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. ताटात आता पालेभाज्या परतू लागल्या आहेत. मोशी व पिंपरी उपबाजारात पालेभाज्यांची आवक स्थिर असून, पालेभाज्यांचे दर घटले आहेत. पावसामुळे पालेभाज्यांची उपबाजारात प्रचंड आवक झाली असून, आवक वाढल्याने दर घसरले आहेत. काही दिवसांपूवी, शेतकर्‍यांचा राज्यव्यापी संप व पावसाने दडी मारल्याने पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील मोशी व पिंपरी उपबाजारात दिवसेंदिवस पालेभाज्यांच्या आवक वाढत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर निम्म्याने घसरले आहेत.

खानावळ चालकांनाही फटका
भाजीपाल्याचे दर वाढल्याचा फटका सर्वसामान्यांबरोबरच खानावळ चालकांनादेखील बसला होता. त्यामुळे कडधान्ये, डाळी व तुलनेत स्वस्त असलेल्या फळभाज्यांचा आहारात समावेश करण्यात आला होता. बाजारातील ही स्थिती यंदा सुमारे दोन महिने राहिली होती. पावसाने ओढ दिल्याने संकट ओढावले होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. दुसर्‍या बाजूला किरकोळ बाजारामध्ये पालेभाज्या व फळभाज्यांना आषाढ महिना आणि चातुर्मास सुरू असल्याने भाज्यांना उठावही नसल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

कोथिंबीर, टोमॅटो आवाक्याबाहेरच
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीचा प्रति गड्डीचा भाव निम्म्याने घटला असून, तो 15 ते 20 रुपयांवर पोहचला आहे. तर ग्रामीण भागात तुलनेत हे दर घटलेले आहेत. याशिवाय टोमॅटोचा प्रतिकिलोचा दर 60 ते 80 रुपये असून, आणखी काही दिवस हे दर चढेच राहतील, असा अंदाज उत्पादक बाळासाहेब थोरवे यांनी व्यक्त केला. गेले दोन महिने भाजीपाल्यांचे दर वधारले होते. कोथिंबीर गड्डीचा भाव 50 रुपयांवर पोचला होता. तर मेथी 25 रुपयांवर पोचली होती. याशिवाय शेपू, पालक, अंबाडी, आंबटचुका या पालेभाज्यादेखील 15 ते 20 रुपयांना उपलब्ध होत्या.