जळगाव। कांचननगरात पुर्ववैमनस्यातून एकावर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणाच्या डोळ्याजवळ गंभीर इजा झाल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात हल्लेखोर दोन्ही भावडांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसोदा रोड परिसरातील रहिवासी योगेश नामदेव इंगळे (वय-28) आणि कृष्णा साहेबराव सपकाळे या दोघांमध्ये शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून बाचबाची होवून वाद झाला होता.
शनिपेठ पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल
आज रविवारी दुपारी कांचननगरात योगेश हा मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी अचानक कृष्णा याने योगेशवर हल्ला चढवून त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर कृष्णा याचा भाऊ यानेही योगेश याच्यावर चॉपरने वार केला. यात योगेशच्या डोळ्याजवळ जबर इजा होवून रक्तस्त्राव सुरू झाला. मारहाण सुरू असतांना योगेश याचा भाचा विनोद दर्यौधन कोळी, पत्नी कविता तसेच आई पुष्पाबाई यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही भावांनी योगेशला बेदम मारहाण करून पळ काढला. विनोद याने मामा योगेश याला जखमी अवस्थेत रिक्षात बसवून शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले. मात्र, योगेश हा गंभीर जमखी असल्याने पोलिसांनी त्याला लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविले. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींनी योगेश याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी शनिपेठ पोलिसांनी जिल्हा रूग्णालय गाठून योगेश याचे जबाब नोंदवून घेतले असून त्यानुसार कृष्णा सपकाळे व श्याम सपकाळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.