नुकसानीचा अहवाल तहसील प्रशासनाला प्राप्त ; आता भरपाईची प्रतीक्षा
यावल- तालुक्यातील मोहराळा शिवारात 26 एप्रिलच्या रात्री आलेल्या वादळी वारा व पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून यावल तहसील विभागास प्राप्त झाला आहे. यात वादळी वार्यात बाधीत क्षेत्र 48.1 हेक्टर असून मोहराळा शिवारातील येणार्या विविध 97 शेतकर्यांचे यात नुकसान झाल्याचे अहवाल सादर करण्यात आले आहे.
48 लाखांचे केळीचे नुकसान
यावल तालुक्यातील मोहराळा शिवारात 26 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे कोरपावली, महेलखेडी, मोहराळा, सावखेडासीम, विरावली, नावरे, वढोदे प्रगणे यावल, यावल शहर क्षेत्र, कोळवद, वड्री या गावातील एकूण पिकाखालील क्षेत्र 87.42 पैकी सहा गावांच्या आकारणी अहवालात 48.1 बाधीत क्षेत्रात केळी पिकांचे 48 लाख नऊ हजार रुपयांचा नुकसानीचा प्राथमिक अहवाल यावल तालुका प्रभारी कृषी अधिकारी एस.आर.पाटील यांनी यावल तहसीदार जितेंद्र कुंवर यांना सादर केला आहे.
यांनी केला नुकसानीचा पंचनामा
कृषी अधिकारी एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी गजानन निंबोळकर व भगवान मालचे, यावल सजाचे तलाठी एस.व्ही.सूर्यवंशी, मुकेश तायडे, व्ही.झेड.सरदार, एम.ई.तायडे, एन.व्ही.मिसाळ, व्ही.बी.नागरे यांनी त्यांना सहकार्य केले. प्रत्यक्षात पंचनामे करण्याच्या कार्याला 2 मे पासुन सुरूवात झाल्याचे नायब तहसीलदार आर. के.पवार यांनी सांगितले.