मोहाडीरोड परिसरातील लांडोरखोरी उद्यान ठरेल नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी

0

जळगाव। वन विभागाने मोहाडी रोडवर लांडोरखोरी उद्यान निर्माण केले असून नागरिकांसाठी व निसर्गाचा सानिध्य हवा असणार्यांसाठी पर्वणीच असल्याची माहिती उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक एस.आर.पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी एन.जी.पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. स्वास्थ कल्पनेस प्रोत्साहन देण्यासाठी 3 कि.मी. लांबींचा जॉगींग ट्रॅक तयार करण्यात आला असून, 5 कि.मी व 8 कि.मी लांबीचा जॉगींग ट्रॅक पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात खुली व्यायामशाळा असून व्यायामाचे साहित्य नागपूर येथून आणण्यात आले आहे. या उद्यानात रानटी डुक्कर, निलगाय, ससे, सरपटणारे प्राणी, पक्षांच्या विविध जाती, लांडगे आपणांस दर्शन देऊ शकतात. उद्यानात येणार्‍या नागरिकांसाठी निरीक्षण मनोरे, निसर्ग माहिती केंद्र, पिण्याचे पाणी उपलब्ध आहेत.

70 पैकी 10 हेक्टरवर उद्यान
वनविभागाच्या 70 हेक्टर जागे पैकी सुमारे 10 हेक्टर जागेवर हे उद्यान बनविण्यात आले. 1 जुलै 2016 ला या उद्यानासाठी पहिले झाड लावले. या उद्यानात सुमारे 3 हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. सर्वधर्मीय वन अशी नविन संकल्पना येथे राबविण्यात आलेली असून त्यात रामायण वन, रामायणात उल्लेख असलेल्या अनेक वनस्पती या उद्यानात दिसतील, महाभारत उद्यान, अशोक उद्यान, जैन उद्यान, इस्लाम उद्यान, ख्रिस्ती उद्यान, त्रिफळा उद्यान, बौध्द उद्यान, गणेश आराधनेत लागणार्‍या विविध वनस्पतींचे गणेश वन, पंचवटी वन, गुलाब उद्यान, नंदन वन, लाख वन, 12 राशी व 27 नक्षत्रे नुसार विविध राशींसाठी लाभ दायक असलेले वृक्ष माहितीसह नक्षत्र उद्यान, अंजिर उद्यान, ताड उद्यान, वेळू(बांबू )उद्यान निर्माण करण्यात आले आहे. औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडे लावण्यात आली आहे. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यांसारख्या 70 हून अधिक वनस्पतींची झाडे या उद्यानांमध्ये झाडांची माहिती व त्यांचे औषधी गुणधर्मांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

उद्यानासाठी 1.8 कोटीचा खर्च
उद्यानात 70 हुन अधिक वनस्पतींच्या प्रजाती, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 15 पेक्षा अधिक प्रजाती, पक्षांच्या 68 प्रजाती,बांबु उद्यानात 35 प्रकारच्या बांबू प्रजाती, अंजीर उद्यानात अंजीर प्रजाती, ताड उद्यानात 32 ताड प्रजाती. हर्बल उद्यानात मनुष्याच्या प्रकृतीस आवश्यक अशा 108 प्रकारच्या वनस्पती आहेत. वनविभागाने येथे गेल्या पाचा ते सहा वर्षात जाणीवपुर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसीत केले आहे. लांडोरखोरी उद्यान उभारणीसाठी जवळपास 1.8 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.