मोहिते, शेटे, जिकमडे यांना गौरवणार

0

मुंबई । शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावणार्‍या या खेळातीलसंघटक गोविंदराव मोहिते, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आणि माजी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे यांना कबड्डी दिनाचे औचित्य साधून कबड्डी रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. शनीवारी संध्याकाळी आरएमएमएस सभागृहात होणार्‍या समारंभात या तिघांना सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ अशा स्वरूपाचा पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी कबड्डी संघटक गणपत लाड अरुण दळवी, श्रेयस म्हसकर व भारत संधाने यांना कबड्डी गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. हा गौरव सोहळा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व स्पोर्ट्स असोशिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेन यांच्या वतीने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सहकार्याने होणार आहे. यावेळी मुंबई शहर कबड्डी संघटनेत अविरत कार्य करणारे माजी ज्येष्ठ सदस्य दत्ता देवधरे यांचा पंच्याहत्तरी निमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शालेय मुलांसाठी मोफत झालेल्या कबड्डी नियमांवर आधारित प्रश्नोत्तरे पर्धेमधील 10 विजेत्यांना माजी क्रिकेटपटू अनंत भालेकर, कबड्डीप्रेमी निवृत्ती देसाई व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार दिला जाणार आहे.