मोहिनीला मिळाले हक्काचे घर ; ‘शताब्दी स्मृती’ ची चावी सुपूर्द

0

शहरातील गरजू परीवारांची आपल्याला जाणीव ; महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज

फैजपूर:- लोकसहभागातून असे उपयोगी कार्य होवू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोहिनीच्या ‘शताब्दी स्मृतीचे’ आहे. निमित्त होते ते नगरपालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे शताब्दी महोत्सवाचे. लोकसहभागातून अनेकदा चांगली कामे होवू शकतात. त्यामुळे समाजात एक चांगला संदेश मिळतो. मोहिनीचा हा एकच परीवार नाही, असे अनेक गरजू परीवार शहरात राहतात त्याची सुद्धा मला जाणीव असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराजांनी येथे सांगितले. रविवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 वाजता म्युनिसीपल हायस्कूलमध्ये शिकणार्‍या मोहिनीच्या परीवाराला महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ’शताब्दी स्मृती’ घर देण्यात आले. प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, मानभाव संस्थांचे मानेकर बाबा, डोंगरदे येथील स्वरूपानंद महाराज उपस्थित होते.

गरजूंच्या मदतीसाठी छोटीशी सुरुवात -जनार्दन महाराज
महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, शहरात एक मोहिनीच नाही असे अनेक परीवार गरजू असून त्यांना सावलीची आवश्यकता आहे परंतु अशा गरजू लोकांच्या आवश्यकतेसाठी सुरुवात व्हावी म्हणून आपण हा एक केलेला प्रयोग आहे. आपलीही काहीतरी भूमिका आहे या देशाची, या भूमीचे आपले काहीतरी देणे लागतो म्हणून हा उद्देश माझा होता. शहरात आजपर्यंत लोकसहभागातून तीन कार्यक्रम झाले आहे. म्युनिसीपल हायस्कूल शताब्दी महोत्सव, मोहिनीचे शताब्दी स्मृती आणि ऋतुजा भारंबे हिला चार वर्षपूर्वी लोकसहभागातून पुन्हा जीवनदान मिळाले हा लोकसहभागाचा भाग होता. शहरात संवेदनाचे प्रमाण असेल ते तर ऋतुजा तिच्या जन्मापासून शहरातील नागरिकांनी सहकार्य केले त्या मुळेच ऋतुजा जिवंत आहे हे एक प्रतीक आहे. शताब्दी महोत्सव घेण्यात आला त्यावेळी मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष होण्यामागचे कारण होते ते फैजपूर म्युनिसीपल हायस्कूल वाचले पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे, ते सुरक्षित राहिले पाहिजे कारण की असे जे गरीब मुले आहेत त्यांना जर मोठे व्यासपीठ मिळू शकते ते फक्त म्युनिसीपल हायस्कूलमध्येच. मोहिनी चव्हाण हिला घर देण्याचा जो संकल्प आपण केला होता आणि सर्वांच्या प्रेरणेतून श्रद्धेतून हे निर्माण झाले इतके सुंदर घर होईल हे माझ्या मनातदेखील नव्हते पण संकल्प कदाचित चांगला पवित्र निस्वार्थ असल्यामुळे परमेश्वराने अनेक देवदूत पाठवले आणि चांगले निर्माण झाले. याच मला खूप आनंद असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सांगितले.

मोहिनीच्या रूपाने घरात लक्ष्मीच
आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, असा पराीवार की ज्यांनी घर नव्हते, रेशन कार्ड, आधार कार्ड नव्हते परंतु मोहिनीसारखी मुलगी जन्माला येणे एक प्रकारे लक्ष्मीच जन्माला आहे. तिने शताब्दी महोत्सवात एका गाण्यावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली हे एक देवाने दिलेले रूपच असते. संत महात्म्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले. संतांनी आदेश द्यावाी व तो आम्ही पूर्ण करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. 70 वर्ष स्वातात्र्यांला झालो मात्र आजही अनेक परीवार अन्न, वस्त्र व निवार्‍यापासून वंचित आहे ही बाब निश्‍चित आमच्यासाठी दुर्दैवी आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकार म्हणून हे शक्य नाही ते लोकसहभागातून ते शक्य झाले आणि हा मूल्यवान क्षण शतत आयुष्यभर प्रेरणा देत राहील, असेही आमदार जावळे म्हणाले.

आमदार जावळेंकडून शाळेला पाच लाखांची मदत
शताब्दी महोत्सवात शिक्षण मंत्री यांनी म्युनिसीपल हायस्कूल दत्तक घेण्याचे जाहीर केले होते. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी खंत व्यक्त केली की, म्युनिसीपल हायस्कूलचा ई लर्निंग चा प्रस्ताव पाठवून सुद्धा काही मदत मिळालेलीी नाही. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे यांनी लागलीच या शाळेच्या ई लर्निंगसाठी आमदार निधीतून पाच लाख देतो आणि मोहिनी चव्हाण हिच्या शताब्दी स्मृती साठी सोमवारी लागलीच 51 हजार रुपयांचा धनादेश महाराजांकडून आणून देतो, असे आश्‍वासन दिले.

माझ्या स्वनातील घर मिळाले
मी कधीही विचार केला नव्हता की, मी एका छान घरात राहू शकेल, असा आम्ही कधीही विचार केला नव्हता. एका सांस्कृतिक कार्यक्रमात मी नृत्य केले आणि ते महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांना आवडले आणि त्यांनी माझी विचारपूस केली आणि माझ्या स्वप्नातील घर मला मिळवून दिले त्याबद्दल सर्व देवदूत यांचे आभार व्यक्त करते. मी खूप शिकून महामंडलेश्वर जनार्दन महाराज, आई-वडील, माझे शिक्षक व शाळा यांचे नाव मोठे करेल. आम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड नव्हते तेदेखील महाराजांमुळे आम्हाला मिळाले, मी खरोखर नशिबवान असल्याचे मोहिनी चव्हाण हिने सांगितले.

घर बघून मोहिनीला अश्रू अनावर
मोहिनी हिला लोकसहभागातून ’शताब्दी स्मृती’ हे घर मिळाले. तिने हा विचार कधीही केला नसावा. वाटत असावे आपले सुद्धा एक घर असावे परंतु तिच्या स्वप्नातील घर साकार झाल्याने मोहिनी व तिची आई वडील यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू अनावर झाले. हे बघून उपस्थितांचे डोळे पाणावले.

नवीन संसारोपयोगी वस्तूही मिळाल्या
मुलगी लग्नानंतर सुखी रहावी नवीन संसार असल्याने तिला त्रास नको म्हणून, आई वडील लग्नात संपूर्ण संसारोपयोगी वस्तू देतात त्याच प्रमाणे आज मोहिनी व तिच्या परीवाराला गॅस शेगडी, मिक्सर, भांडी, पाण्याची मोटर, आठ दिवसांचा किराणा अशा अनेक संसार उपयोगी वस्तू सुद्धा मोहिनीच्या परीवाराला देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष कलीम मणियार, नगरसेवक मिलिंद वाघुळदे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, रवींद्र होले, शुभम टेक्स्टाईलचे संचालक सुनील वाढे, म्युनिसीपल हायस्कूल मुख्याध्यापक आगळे, सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टचे सर्व सभासद, शिक्षक, पत्रकार उपस्थित होते.