…म्हणून ससून रुग्णालयावर पडतो रुग्णांचा सतत ताण

0

रुग्णालयात एकूण 1300 खाटांची क्षमता

पुणे : खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी लूट, तेथील न परवडणारे लाखो रुपयांचे उपचार यामुळे ससून रुग्णालयावर सध्या रुग्णांच्या उपचारांचा प्रचंड ताण येत आहे. त्यासाठी रुग्णांना खाटा अपुर्‍या पडत असल्याने त्यांना दरवाजापर्यंत गाद्या टाकून उपचार करावे लागत आहेत. रविवारी इतर काही खासगी रुग्णालये व क्लिनिक्स बंद असल्याने या दिवशीही अतिरिक्त ताण पडत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रासाठी तृतीय स्तर सेवा देणारे राज्य सरकारच्या ससून रुग्णालयात एकूण 1300 खाटांची क्षमता आहे. सध्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दोन हजार रुग्ण उपचार घेतात. तर आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दोनशेच्या आसपास उपचारासाठी दाखल (अ‍ॅडमिट) होतात. तर अगोदरच अ‍ॅडमिट असलेले दोनशेच्या आसपास रुग्णही उपचार पूर्ण करून त्यांना डिस्चार्ज दिला जातो. पण, कधी-कधी रुग्णालयात अचानक जास्तही रुग्ण अ‍ॅडमिट होतात. त्यांना सध्याच्या खाटा अपुर्‍या पडत असल्याने गादी फरशीवर टाकून उपचार करण्याची वेळ येत आहे.

हृदयविकाराचे दहा-दहा रुग्णही

रविवारी खासगी डॉक्टर सुटी घेतात; तसेच खासगी रुग्णालयांमध्येही काही वेळा तातडीची सेवा बंद असते. त्यामुळे बरेच रुग्ण ससून रुग्णालयाचा आधार घेतात. त्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांचा अधिक समावेश असतो. रविवारच्या दिवशी हृदयविकाराचे दहा-दहा रुग्णही उपचारासाठी अ‍ॅडमिट होत असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचीदेखील धावपळ होत आहे.