सुकमा । भेज्जी आणि बुर्कापालच्या नक्षलवादी हल्ल्यानंतर स्थानिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन शनिवारी सुकमाला गेले होते. जगदलपूरमध्ये त्यांनी एका बैठकीत सांगितले की, गुप्तचर विभागाकडून आलेली माहिती आपले जवान गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे याच त्रुटीचा फायदा घेत नक्षलवादी मोठे हल्ले चढवतात. सुकमामध्ये दुपारी पोलीसलाइन हेलिपॅडवरून ते सीआरपीएफच्या सेकंड बटालियन मुख्यालयात थेट दाखल झाले. येथे सुमारे 2 तास थांबले होते. यादरम्यान घेण्यात आलेल्या बैठकीत नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला.
या मोहिमेत जवानांना येणार्या अडचणी जाणून घेतल्या. सुकमाचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी या भागात सुरू असलेल्या मोहिमेच्या नियोजनाची रूपरेषा सादर केली. आयबीप्रमुखांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. जिल्हाधिकारी नीरजकुमार बनसोड यांनी राजीव जैन यांना बँक शाखांचा अभाव, मोबाइल कनेक्टिव्हिटी, रस्ते व मोठे बांधकाम सुरक्षितता नसल्याने होत नसल्याचे सांगितले. यादरम्यान, आयबीचे सहसंचालक देव तरू आणि डीजी (नक्षल ऑपरेशन) आणि डीएम अवस्थी, सीआरपीएफचे महासंचालक बी. एस. चौहान आणि बस्तरचे आयजी विवेकानंद त्यांच्यासोबत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाचे प्रमुख जैन यांनी बुर्कापाल येथील हल्ल्याची माहिती घेतली. सुकमाची बैठक संपवून जैन यांनी पोलीस व सीआरपीएफच्या अधिकार्यांच्या पोलमपल्ली कॅम्पला भेट दिली. सुकमानंतर जैन यांनी जगदलपूरच्या पोलीस मुख्यालयात बैठक घेतली आणि अधिकार्यांना सूचना केल्या.
कोणत्याही माहितीचे गांभीर्य वेळीच ओळखा. तुमच्या कमतरतेचा फायदा घेऊन नक्षलवादी मोठे हल्लेे करतात.
– राजीव जैन, गुप्तचर प्रमुख.
पंडाच्या कबुलीजबाबातून 18 नक्षलवादी पकडले
सुकमा जिल्ह्यातील करिगुंडम भागातून एका मिलिशिया कमांडरसह 18 नक्षलवादी पकडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी पोडियामी पंडा याने दिलेल्या कबुलीजबाबानंतर चिंतागुफा, चिंतलवार भागात या नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. या नक्षलवाद्यांचा बुर्कापाल हल्ल्यात सहभाग आहे. ही मोहीम डीआरजी आणि कोब्राच्या जवानांनी फत्ते केली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. अनेक जवान शहीद होत असल्याने सरकारविरोधात जनतेत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाल्याचे दिसून आले.
शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त
लखिसराय जिल्ह्यातील नक्षलवादी कजरा, पिरी बाजार आणि चानन पोलीस ठाण्यातील घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात शोधमोहीम जोरात सुरू आहे. चानन पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या महुलिया गावापासून 500 मीटर आतमध्ये असलेल्या आमराईतून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यात अडीच ते तीन किलो अमोनियम नायट्रेट, कोडेक्स तार व रिकामे डिटोनेटर्स होते. हे साहित्य मोठा स्फोट घडवण्यासाठी गोळा केले होते.
गेल्या आठवड्यात येथे नक्षलवाद्यांच्या हालचाली पाहण्यास मिळाल्या. या माहितीच्या आधारेच शोधमोहीम पार पडली.
– संजीवकुमार, कजरा पोलीस ठाण्याचे प्रमुख