म्हसावद येथील सरपंचाला मारहाण

जळगाव- तालुक्यातील म्हसावद येथील सरपंचाला विनाकारण मारहाण झाली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
म्हसावद येथे गोविंदा प्रकाश पवार (वय 31, रा.बौद्धवाडा) हे तरुण सरपंच आहेत. त्यांच्या घरात रवींद्र त्र्यंबक हडपे (धनगर) व सतीश पंडित धनगर यांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला. या दोघांना सरपंच पवार यांच्या आई कलाबाई पवार यांनी हटकले. परंतु, दोघांनी शिविगाळ व दमदाटी करीत सरपंच व त्यांच्या आईला मारहाण केली. ‘तू सरपंच झाला आहे. त्यामुळे तुला माज आला आहे का? तुला ग्रामपंचायतीच्या इमारतीवरुन फेकून देईल, अशी धमकी देण्यात आली. याबाबत सरपंच गोविंदा पवार यांनी फिर्याद दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल बळीराम सपकाळे करीत आहेत.