म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचे मत
मुंबई : म्हाडाची 16 डिसेंबरला होणारी लॉटरीची सोडत पारदर्शक होणार असल्याचे मत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत घोळ होत असल्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होते. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी आता म्हाडातर्फे नवीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत चारही गटातील 1386 घरांसाठी 1 लाख 32 हजार अर्ज आले आहेत. त्यातील 80 हजार अर्जधारकांनी पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पूर्वीच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये 3 पंचाकडून लॉटरीचा अंक काढला जात होता. पण आता यात बदल करण्यात आला आहे. 6 पदसिद्ध पंच लॉटरी काढणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच भविष्यात सर्वसामान्यांसाठी म्हाडा जादा घरे बांधणार आहे. पहाडी गोरेगाव येथे 6500 घरांची निर्मिती करण्याचे म्हाडाचे धोरण असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये उमेदवारासमोर एव्हीएम मशीन उघडली जाते. त्याप्रकारे लॉटरी प्रक्रियेत अर्जधारक स्वतः सहभाग घेऊ शकतील, अशी व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. लॉटरीच्या माध्यमातून ज्यांना खोली लागली अशा अर्जधारकांना प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. त्यांना एसएमएस, ई मेलच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. तसेच स्टँप पेपरवर पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन फॉर्म दिले जातील. त्यात फक्त सही करून फॉर्म म्हाडात जमा करायचे आहेत, असे सामंत म्हणाले.