म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून फसवणुक

0

मुंबई : म्हाडाचे घर तसेच बारमध्ये म्युझिम सिस्टमध्ये पार्टनरशीप देण्याचे आमिष दाखवून सुमारे बारा लाख रुपयांची फसवणुक झाल्याची घटना परळ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या दुकलीने अशाच प्रकारे अन्य काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. अनंत भास्कर पाटील हे परळ येथील गांधी हॉस्पिटलजवळील राजकमल लेन, बेस्ट वसाहतीत राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांची दोन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी म्हाडामध्ये आपली ओळख आहे. काही अधिकार्‍यांच्या मदतीने आपण त्यांना म्हाडाचे फ्लॅट मिळवून देतो असे सांगितले होते. तसेच बारमध्ये म्युझिक सिस्टमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळेल असे सांगून त्यांना पार्टनरशीप देण्याचे आश्‍वास दिले होते. म्हाडाचे घर आणि पार्टनरशीपच्या नावाने या दोघांनी अनंत पाटील यांच्याकडे टप्याटप्याने बारा लाख रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांना म्हाडाचे घर तसेच पार्टनरशीप मिळवून दिली नाही. तसेच दोघेही त्यांचे फोन बंद करुन पळून गेले होते. हा प्रकार अनंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी काल सायंकाळी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी या दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन्ही आरोपी भामट्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत ते दोघेही फरार असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.