म. गांधींचा खून करणार्‍या शक्ती देश काबीज करत आहेत : आवटे

0

नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

पिंपरी : महात्मा गांधींचा खून करणार्‍या शक्ती आता देश काबीज करता आहेत, हा खरा चिंतेचा विषय आहे. अशी विपरीत परिस्थिती असली तरी सर्व काळ भारतीयांना कोणीही फसवू शकत नाही. यासाठी सामान्य माणसांनी आणि विशेषतः महिलांनी व्यक्त होऊन आपली भूमिका मांडणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले. शुक्रवारी काकडे पार्क येथे केले. नेत्रसेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत ‘आयडिया ऑफ इंडिया’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना संजय आवटे बोलत होते.

शहिद भगतसिंग यांचा आर्दश घ्यावा
नागरी हक्क सुरक्षा समिती संस्थापक मानव कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणले की, छत्रपती शिवरायांचे धोरण जनतेच्या काडीलासुद्धा हात लावायचा नाही असे होते; तर आजच्या सरकारचे धोरण जनतेच्या घरात काडीदेखील शिल्लक राहता कामा नये असे आहे. अशा परिस्थितीत सर्वाना समान संधीचा पुरस्कार करणार्‍या शहीद भगतसिंग यांचा आदर्श घ्यावा लागेल. यावेळी व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, उद्योजक दिलीप सोनिगरा, काळुराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक प्रदीप पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्याख्यानापूर्वी अनुष्का चिटणीस, आत्रेय गांधलीकर, वरद दीक्षित या बालशाहिरांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले.

सामुहिक शहाणपणावर देश उभा
संजय आवटे पुढे म्हणाले की, सध्या महापुरुषांचे अपहरण केले जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आता बाबासाहेबांना आपले मानू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशातील प्रत्येक भाषण महात्मा गांधींचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. अनेक भाषा, धर्म आणि पंथ असलेला हा वैविध्यपूर्ण देश आहे. सध्या पंडित नेहरूंची खूप टिंगल टवाळी केली जाते; पण महात्मा गांधी यांनीच पंडित नेहरूंना आपला राजकीय वारसदार घोषित केले होते. कारण नेहरूंकडे वैश्‍विक दृष्टी होती. जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम नेहरूंनी केले होते. अफाट लोकप्रियतेच्या बळावर हुकूमशहा होणे नेहरूंना सहज शक्य होते; पण त्यांची लोकशाही तत्त्वावर नितांत श्रद्धा होती. महात्मा गांधी यांनी कधीही धर्म नाकारला नाही किंवा परंपरेचा वारसाही नाकारला नाही. गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच ‘आयडिया ऑफ इंडिया’ होय. कारण या तीन महापुरुषांना टाळून भारताला पुढे वाटचाल करणे शक्य नाही. या देशातल्या सामान्य माणसांच्या सामुहिक शहाणपणावर हा देश उभा आहे. उद्या कदाचित राजकीय पक्ष आपले मूल्य विसरतील; पण या देशाच्या सामूहिक शहाणपणावर हा देश चालेल, असा ठाम विश्‍वास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला होता.

म्हणजेच ‘आयडिया ऑफ इंडिया’ होय
व्याख्यानात पुढे आवटे म्हणाले की, भारताने कायम आपले स्वयंप्रज्ञा धोरण सिद्ध केले असले तरी सद्य:स्थितीत देशाचे रूपांतर हिंदूंचा पाकिस्तान करण्याचेच आहे. आम्ही भारतीय लोक खूप ढोंगी आणि दांभिक आहोत. आमच्या विचार आणि कृतीत जेव्हा द्वैत निर्माण होते तेव्हाच देशाचा सत्यानाश करणार्‍या भीमा-कोरेगाव सारख्या घटना घडतात. जातीअंताची लढाई करण्याऐवजी आम्ही शिवबा-जोतिबा अशा महापुरुषांच्यानावाने नवीन जाती निर्माण करू लागलो आहोत. इ.स.2019 मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण अटळ आहे. माध्यमांचे सरकारीकरण आणि राष्ट्रवादाचे धार्मिकीकरण लोकशाहीला घातक आहे. सक्षम विरोधक, न्यायासमोर सर्व समान, सहिष्णुता आणि सामूहिक शहाणपण या चतु:सूत्रीवर लोकशाही बळकट होते, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. यासाठीच महापुरुष नव्याने समजून घेत जातीय ताणतणाव निर्माण होणार नाही, असे वातावरण निर्माण करणे म्हणजेच ‘आयडिया ऑफ इंडिया’ होय.

संत तुकाराम, रामचंद्र गुहा, विन्स्टन चर्चिल, आयेशा सिद्दिका, लॉर्ड माउंटबॅटन, रघुराम राजन असे अनेकांचे संदर्भ उद्धृत करीत अतिशय ओघवत्या शैलीतल्या आपल्या व्याख्यानाचा समारोप संजय आवटे यांनी सुरेश भट यांच्या गझलेने केला. मानसी चिटणीस, सुहास घुमरे, प्रदीप गांधलीकर, हृषीकेश पवार, प्रमोद शिंदे, श्रीहरी गुरव, राजेंद्र कोकाटे यांनी संयोजनात सहकार्य केले. सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत माळी यांनी आभार मानले.