यंग बिग्रेडचा शानदार विजय

0

मुंबई : पहिल्या सराव सामन्यात धोनीच्या जलव्यात पराभवाचा सामना केलेल्या भारत अ संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र अधिक सिनियर खेळाडू नसताना इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारतीय अ संघांचाच वरचष्मा पहायला मिळाला. इंग्लंडने दिले २८२ धावांचे लक्ष्य या यंग ब्रिगेडने ४० षटकांतच पूर्ण केले. भारत अ संघांचा कप्तान अजिंक्य रहाणेने शानदार ९१ धावांची खेळी करत पहिल्या विकेटसाठी शेल्डन जैक्सन (५९) सोबत चांगली भागीदारी करून विजयाचा पाया रचला. यानंतर अजिंक्यने रिषभ पंत (५९) सोबत दावा मजबूत केला. सुरेश रैनाने (४५) देखील आश्वासक खेळी करत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. तत्पूर्वी भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीने इंग्लंड संघाला जोखडून ठेवले, मात्र शेवटच्या षटकांत शेवटच्या जोडीने प्रभावी खेळी करत इंग्लंडला २८३ धावांपर्यंत पोहोचविले. या पराभवाने इंग्लंडच्या समोर भारतीय संघासमोर खेळण्याचे आव्हान अजूनच कठीण झाले आहे.

युवा गोलंदाजांचा नियंत्रित मारा
भारत अ च्या युवा खेळाडूंनी नियंत्रित मारा करताना इंग्लंड इलेव्हनला दुस-या सराव सामन्यात २८२ धावांवर रोखले. मंगळवारी झालेल्या पहिल्या सराव सराव सामन्याच्या तुलनेत भारतीय संघात यावेळी युवा व अननुभवी खेळाडूंचा भरणा अधिक होता. तरीही, त्यांनी नियंत्रित मारा करुन इंग्लंडला तीनशेचा पल्ला मारु देण्यापासून रोखले. मात्र, इंग्लंडची ९ बाद २११ अशी अवस्था केल्यानंतरही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत अ ला आव्हानात्मक धावसंख्येला सामोरे जावे लागेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गनने सलग दुस-यांदा नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय – अ‍ॅलेक्स हेल्स यांनी आक्रमक सुरुवात करताना भारतीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रदीप सांगवानच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर नियंत्रण गमावलेला रॉय हिट विकेट झाल्याने भारतीयांना पहिले यश मिळाले. यानंतर हेल्स – जॉनी बेयरस्टॉ यांनी ७४ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला मजबूत स्थितीमध्ये आणले. फिरकीपटू शाहबाझ नदीमने हेल्सला बाद करुन ही जोडी फोडली

इंग्लंडची अखेरची जोडी प्रभावी
भारतीयांनी ठराविक अंतराने बळी घेत इंग्लंडची ३९व्या षटकात ९ बाद २११ अशी अवस्था केली. परंतु, आदिल रशिद – डेव्हीड विली या अखेरच्या जोडीने संयमी फलंदाजी करताना निर्णयक ७१ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला आव्हानात्मक मजल मारुन देण्यात यश मिळवून दिले. ४९व्या षटकात सांगवानने रशिदला बाद करुन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. रशिदने ४२ चेंडूत ४ चौकारांसह ३९ धावा काढल्या. तर, विली ३० चेंडूत २ चौकार व २ षटकार मारुन ३८ धावंवर नाबाद राहिला. भारत अ कडून परवेझ रसूलने ३८ धावांत ३ बळी घेतले. त्याचप्रमाणे, प्रदीप सांगवान, अशोक दिंडा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.

तुरळक प्रेक्षकांची उपस्थिती
मंगळवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवरच झालेल्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान मुंबईकरांची तुफान गर्दी झाली होती. मात्र, दुस-या सराव सामन्यात त्यातुलनेत प्रेक्षकांची उपस्थिती होती. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे नेतृत्व पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हे यावेळी स्पष्ट झाले. पहिल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलेली चढाओढ दुस-या सामन्यादरम्यान पहायला मिळाली नाही. या सामन्यात सुरेश रैना, अजिंक्य रहाणे स्टार खेळाडू होते मात्र तरीही प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. पहिल्या सामन्याला मात्र आंतरराष्ट्रीय सामन्याचे चित्र आले होते. असे असून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.