यंत्रसामुग्रीच्या अभावाने महामार्ग चौपदरीकरण संथगतीने

0

चार वर्षांपूर्वीच महामार्गावर झाली वृक्षतोड ; लोकप्रतिनिधींच्या रेट्याची गरज

भुसावळ (विजय वाघ)- धुळे ते नागपुर महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असलातरी संबधीत कंपनीच्या माध्यमातून यंत्रसामुग्रीचा अभाव असल्याने या कामाला मंदगती प्राप्त झाली आहे. यामुळे वारंवार केवळ महामार्गालगतच्या जागेची मोजणी करण्यावर भर दिला जात असल्याने अनेकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शासनाने धुळे ते नागपुर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामासाठी शेतजमीन संपादन केली यामुळे चौपदरीकरणासाठी चार वर्षापूर्वीच महामार्गालगतच्या वृक्षांची तोड करण्यात आल्याने लवकरच चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात होईल, अशी नागरीकांना अपेक्षा निर्माण झाली होती मात्र काही भागात भुसंपादनाचा प्रश्‍न प्रलंबित राहिल्याने चौपदरीकरणाच्या कामास चार वर्षांपासून मोगरी लागली होती. यासाठी शासनाने पुढाकार घेवून भुसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावून या कामाची फेरनिविदेद्वारे कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली तसेच पाच महिन्यांपासून महामार्गालगतच्या जागेची मोजणी करून जागेचे सपाटीकरण सुरू करण्यात आले आहे मात्र पुढील कामासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री कंपनीच्या माध्यमातून अद्यापही उपलब्ध न झाल्याने या कामाची केवळ मोजणी करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे नागरीकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

अशी आहे कामाची सुरूवात
महामार्गाच्या कामासाठी धुळे ते नागपुर असे विविध टप्पे करण्यात आले असून भुसावळ विभागात तरसोद ते चिखली (घोडसगाव) असा टप्पा ठरवण्यात आला आहे. या भागातील तरसोद ते फुलगाव मार्गाचे काम आयुष या कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने आपल्या हद्दीतील महामार्गालगतच्या जमिनीचे मे महिन्यात सपाटीकरण केले आहे.

यंत्रसामुग्रीचा अभाव
महामार्गालगतच्या संपादीत केलेल्या जमिनीचे मोजमापानुसार सपाटीकरण करण्यात आले आहे मात्र यानंतरच्या पुढील कामासाठी अत्यावश्यक यंत्र सामुग्रीची उपलब्धता नसल्याने या कामाला मंदगती प्राप्त झाली आहे तर महामार्गावरील कपिलवस्तूनगर परीसरात कामगारांसाठी व साहित्य ठेवण्यासाठी शेड उभारणीचे कामास सुरूवात केली आहे मात्र काम सुरू असल्याचे दाखवण्यासाठी चार महिन्यांपासून केवळ मोजणीवरच भर जात असल्याने नागरीकांमध्ये आश्‍चर्ययुक्त नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुलाचे बांधकामही रखडले
सद्यस्थितीत महामार्गावरील पुलाचे नुतनीकरण व रूंदीकरण करणेही आवश्यक आहे मात्र महामार्गावरील चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या पुलाच्या बांधकामास अद्यापही कुठल्याही प्रकारे सुरूवात झाली नाही. यामुळे या कामास विलंब होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष
चौपदरीकरणासाठी भुसंपादन होताच शासनाच्या माध्यमातून चार वर्षापुर्वी महामार्गालगतच्या डेरेदार वृक्षांच्या कत्तलीला प्राधान्य देण्यात आले मात्र यानंतरही कामाला सुरूवात न झाल्याने वृक्षप्रेमीधारकांनी नाराजी व्यक्त केली तसेच अनेक वाहनधारकांना उन्हाळ्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो यामुळे महामार्ग प्राधीकरणाने चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवर नियोजित आराखड्यानुसार वृक्षरोपांची लागवड करणे आवश्यक असतांना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

लवकरच कामाला मिळेल गती
चौपदरीकरणाच्या कामास पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मंदगती प्राप्त झाली आहे मात्र लवकरच या कामाला गती मिळणार असल्याचे प्रकल्प संचालक सिन्हा यांनी सांगितले.