यंत्राद्वारे स्वच्छतेची चाचणी पुण्यात यशस्वी

0

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते स्वच्छ करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला असून त्यासाठीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

रस्त्यावर सखोल स्वच्छता करून धुळीचे प्रमाण जास्तीतजास्त कमी करणे. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या कुंपणांच्या भिंती, रस्त्यातील दुभाजक, विजेचे खांब यांचीही स्वच्छता या यंत्राद्वारे करणे शक्य आहे. शिवाय रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी झुडपे आणि फांद्या काढण्यासाठी खास साधने या तंत्रज्ञानात आहेत. जर्मनीमधील एसटीआयएचएल कंपनी आणि अमेरिकेतील चॅलेंजर कंपनी या दोन कंपन्यांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान पुण्यात राबविले जाणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीने औंध, बालेवाडी भागात पाच आठवडे पथदर्शी प्रकल्पाद्वारे (पायलट प्रोजेक्ट) चाचणी घेतली. त्या चाचण्या यशस्वी झाल्याचे पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. बाणेरमधील ‘अभिमानश्री’ सोसायटी मध्ये या प्रयोगाची अंतिम चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली. या चाचणीच्यावेळी डॉ.जगताप, महापालिकेच्या वाहन विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पोळ, चॅलेंजर स्वीपर्सचे मायरेक बायजिंन्सकी, स्वच्छता उपनिरीक्षक भोईर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.