पिंपरी-चिंचवड : सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करावा. गणेशोत्सवाला गालबोट लागेल, असे कोणतेही काम करू नका. वर्गणी गोळा करताना दादागिरी किंवा जबरदस्ती करू नका. शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना एकाच ठिकाणी परवानगी देण्यात येईल. प्रत्येक मंडळाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषण टाळा, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. गणेशोत्सव यावर्षीदेखील शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका व पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुरुवारी पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात बैठक पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) शशिकांत शिंदे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पुणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त संजयकुमार बाविस्कर आदी उपस्थित होते.
प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे लक्ष
यावेळी बोलताना रश्मी शुक्ला म्हणाल्या की, गणेश मंडळांनी गणेश उत्सवाला गालबोट लागेल, असे कोणतेही काम करू नये. गणेश मंडळांकडून काही चुका झाल्या तर, आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते. यावर्षी प्रत्येक गणेश मंडळामध्ये जाऊन पोलीस ध्वनीप्रदूषण चाचणी करणार आहेत. ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडणार्या गणेश मंडळांवर कारवाई होईल. प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. प्रत्येक मंडळाने मंडपामध्ये महत्त्वाचे फोन नंबर असलेला फलक लावावा. प्रत्येक पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, मंडळांचे अध्यक्ष त्यामध्ये समाविष्ट केले जातील. पोलिसांचे त्याकडे लक्ष आहे, हे विसरू नका. पोलिसांना सहकार्य करा, असे शुक्ला यांनी सांगितले.
मंडप शुल्क कमी करण्याचा प्रयत्न
या बैठकीमध्ये गणेश मंडळांनी मंडप शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी, मंडप शुल्क कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच आरोग्य विभागातर्फे प्रत्येक मंडळास प्रत्येकी दोन फलक दिले जातील. ज्यामध्ये आरोग्य विषयक जनजागृती केलेली असेल, असेही हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.