भुसावळ : हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे रात्री नऊ वाजेच्या सुमारासे संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाण्यामुळे तापी नदीला पूर आला असून प्रशासनाने नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूर धरणातून प्रतीसेकंद 3544 क्युमेक्स अर्थात एक लाख 25 हजार 156 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणार्या तापी व पूर्णा नदीच्या खोर्यात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे मंगळवारी 16 दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला तर आवक वाढल्याने बुधवारी सकाळी दोन दरवाजे पुन्हा उघडून 18 दरवाजांतून विसर्ग झाला. मात्र पावसाचा जोर व आवक वाढत असल्याने दुपारी 2 वाजता 22 दरवाजे तर रात्री नऊ वाजता 41 दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, यंदाच्या हंगामात प्रथमच धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाची हजेरी
हतनूर धरणाच्या तापी व पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रातील पर्जन्यमापक केंद्रांवर दमदार पावसाची नोंद झाली. यात बर्हाणपूर येथे 13.2, देडतलाई 26.6, टेक्सा 54.2, ऐरडी 5.8, गोपाळखेडा 25.0, चिखलदरा 78.8, लखपूरी 21.6, लोहारा 33.6, अकोला 13.0 मिली पावसाची नोंद करण्यात आली दरम्यान, हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ या 24 तासांच्या दरम्यान 271.08 मिली पाऊस झाला. तर बुधवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेदरम्यान 156 मिली पावसाची नोंद करण्यात आली. धरणात विसर्गानंतर 208.770 मिटर जलपातळी तर 161.10 दलघमी जलसाठा कायम आहे.