यंदा महापालिका छापणार वार्षिक ’डायरी’

0

पिंपरी-चिंचवड : पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक यांची माहिती असलेली दैनंदिनी (डायरी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छापली जाते. यंदा मात्र, निवडणुका आणि पदाधिकार्‍यांच्या निवडीस झालेल्या विलंबामुळे सन 2017 ची डायरी छापण्यात आली नव्हती. आता सन 2018 मध्ये आठ हजार डायर्‍या छापण्यात येणार आहेत. एका डायरीसाठी 103 रूपये 50 पैसे खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी आठ लाख 28 हजार रूपये खर्च येणार आहे. या डायर्‍या चिंचवड येथील आशिष एंटरप्रायेजसकडून छापून घेण्यात येणार आहेत. त्या खर्चास देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.22) होणार्‍या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

या डायरीमुळे नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना महापालिकेशी संबंधित माहिती घेणे सुलभ होते. मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. महापौर, उपमहापौर या प्रमुख पदाधिकार्यांच्या निवडीसह स्थायी समितीसह विविध विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालय समितीच्या पदाधिकारी निवडीस अधिक काळ गेला. त्यामुळे सन 2017 ची डायरी न छापण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी नोव्हेंबर महिन्यांच्या सुरूवातीला ‘पॉकेट’ डायर्‍या छापण्यात आल्या आहेत.