यंदा म्हाडा देणार 1001 घरे

0

मुंबई । तमाम मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, घरांची अंतिम संख्या म्हाडाने जाहीर केली असून यंदाच्या लॉटरीत 1001 घरांचा समावेश असणार आहे. यंदाच्या लॉटरीतील निम्मी, म्हणजे पाचशे घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवली आहेत. मुख्य म्हणजे लॉटरी सोहळ्याच्या खर्चात कपात करण्यासाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मंडप उभारून लॉटरी जाहीर करण्याची योजना आहे. त्याशिवाय फेसबुक लाइव्हवर लॉटरीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

म्हाडा घरांची लॉटरी सर्वसाधारणपणे दरवर्षी मे महिन्यात काढली जाते. परंतु यंदा मे महिन्यात लॉटरी काढली जाण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबरला लॉटरी काढली होती. त्यावेळी फक्त 819 घरांचा लॉटरीत समावेश होता. लॉटरीत सर्वाधिक मागणी अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी असते. मागील वर्षी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकाही घराचा लॉटरीत समावेश ससल्याने म्हाडावर खूप टीका झाली होती. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी 283 तर अल्प उत्पन्न गटासाठी तब्बल 500 घरे राखून ठेवली आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.