जळगाव। दि वसेंदिवस वृक्षतोड वाढली असून वृक्षतोडीचे विपरीत परिणामांना संपुर्ण देशाला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. यावर उपायययोजना म्हणून मागील वर्षापासून शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे. मागील वर्षी शासनातर्फे वनमहोत्सवानिमित्त 2 कोटी वृक्ष लागवड केली होती. यावर्षी देखील जळगाव जिल्हा परिषदेतर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून संपुर्ण जिल्ह्यात 4 लाख 31 हजार 625 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतला 375 वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड
दरवर्षी राज्यशासनातर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येत असतो. यावर्षी देखील राज्यशासनाने वृक्षारोपनासाठी तीन वर्षाचे उद्दिष्ट ठरविले आहे. 2017-2019 पर्यत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 2017 वर्षी प्रती ग्रामपंचायत 375 वृक्ष प्रमाणे 4 लाख 31 हजार 625, 2018 वर्षी प्रति ग्रामपंचायत 1115 वृक्षाप्रमाणे 12 लाख 83 हजार 365, 2019 यावर्षी प्रती ग्रामपंचायत 2950 वृक्षाप्रमाणे 33 लाख 95 हजार 850 असे 51 लाख 10 हजार 440 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
ग्रामसभेत होणार जनजागृती
राज्यभरात वृक्षलागवडीबाबत जनजागृती व्हावी, ग्रामसभांमधून नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यासाठी आगामी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये या विषयी चर्चा घडवून आणण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हयातील 1151 ग्रामपंचायतींना आदेश पारित केले आहे.
तालुकानिहाय होणार वृक्षारोपण
2017 या वर्षी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्याला 4 हजार 450, भडगाव 18 हजार 375, भुसावळ 14 हजार 625, बोदवड 14 हजार 250, चाळीसगाव 40 हजार पाचशे, चोपडा 33 हजार 750, धरणगाव 27 हजार 375, एरंडोल 19 हजार पाचशे, जळगाव 26 हजार 250, जामनेर 40 हजार 125, मुक्ताईनगर 23 हजार 250, पाचोरा 37 हजार पाचशे, पारोळा 31 हजार 125, रावेर 35 हजार 625, यावल 25 हजार 125 असे तालुकानिहाय वृक्ष लावड होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही जास्त झाडे लावण्याचे उद्दिष्ये समोर ठेवण्यात आली आहे.