यंदा विसर्जन मिरवणूक 28 तासांऐवजी 20 तासांत संपविण्याचा प्रयत्न करुया

0

पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांचे आवाहन 

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा

पुणे : गणेशोत्सव साजरा करताना आपण परंपरा जपतो. परंतु परंपरेसोबत परिवर्तनदेखील गरजेचे आहे. जसे आपले राहणीमान, कपडे, वैद्यकीय सेवा यांमध्ये बदल झाले, तसेच काळानुरुप कायदयातही बदल झाले. त्याची अंमलबजावणी पोलीस यंत्रणा करते. आपले नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांना उत्सवात ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे आपण कायद्याचा वापर करण्याची संधी देऊ नका. कायदे आपल्या सर्वांसाठी असून त्याची अंमलबजावणी करून एक आदर्श घडवू. तसेच यंदाची विसर्जन मिरवणूक 28 तासांऐवजी 20 तासांत संपविण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गणेश मंडळांना केले.

आदर्श मित्र मंडळाचा प्रथम क्रमांक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, उल्हास पवार, मोहन जोशी, अंकुश काकडे, अशोक येनपुरे, नगरसेवक अजय खेडेकर, दीपक पोटे, अशोक मोराळे, तेजस्वी सातपुते, अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक आदी उपस्थित होते. प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अखिल मंडई मंडळाचे वसंततात्या थोरात यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे केलेल्या गणेशस्तोत्र सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

86 मंडळांनी मारली बाजी

कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे तर कर्वेनगर येथील स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित यांनी पाचवा क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे 45 हजार, 40 हजार, 35 हजार आणि 30 हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 187 मंडळांपैकी 86 मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने 11 लाख 39 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 हजार रुपयांची मदत दिली.

व्यसनमुक्त उत्सव साजरा करा

मागील वर्षीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आपण गणेशोत्सव साजरा करुया. पुण्याबाहेरून येणार्‍या कोणत्याही गणेशभक्ताला त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यायला हवी, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. डॉल्बीचा वापर न करता ध्वनिप्रदूषण विरहित आणि व्यसनमुक्त उत्सव साजरा करायला हवा. प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीला रात्रभर पारंपरिक वाद्य वादनास परवानगी द्यावी. जेणेकरुन मंडळे थांबून राहणार नाहीत आणि मिरवणूक वेळेत संपेल, असे अशोक गोडसे यांनी सांगितले. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.