पुणे । गेल्या वर्षी राज्यात फक्त 42 लाख मेट्रीक टन साखरचे उत्पादन झाले होते.त्यावेळी राज्यात असणार्या दुष्काळी परिस्थितीमुळे हे उत्पादन घटले होते.यंदा मात्र राज्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला त्याचबरोबर परतीच्या मान्सूनने सुद्धा दिलासा दिल्याने यंदा हे विक्रमी उत्पन्न आपण गाठू असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी व्यक्त केला.
90 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज
राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती नसल्याने उसाची चांगली लागवड झाली आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरु आहे. त्यामुळे यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे साखर आयुक्तालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजा नुसार यावर्षी तब्बल 90 लाख मेट्रिक टन साखरचे उत्पादन होईल.
185 कारखान्यांमध्ये गाळप हंगाम
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक कारखान्यांचा गाळप हगाम संपतो पण यंदा अजूनही कारखाने चालू आहेत. गेल्यावर्षी फक्त जेमतेम 90 दिवस गाळप हंगाम सुरु होता, यंदा 180 दिवस गाळप हंगाम सूरू राहील फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्यातील तब्बल 185 साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु आहे. गेल्या वर्षी हीच संख्या फक्त 149 इतकी होती. विक्रमी उत्पादनाला पावसाबरोबर शासनाने साखर कारखान्याबाबत जे काही निर्णय घेतले त्याचाही फायदा होणार आहे. त्यात विशेष करुन शेतकर्यांना उस गाळपापासाठी जिल्ह्याबाहेर किंवा परराज्यात नेण्यास बंदी घातल्याने त्याचा परिणाम झाला आहे. सांगली भागातील अनेक शेतकरी उस हे कर्नाटक राज्यात गाळपासाठी नेतात पण यंदा ही बंदी घातल्याने या उसाचे राज्यात गाळप झाले त्याचाही परिणाम हा उत्पादन वाढी वर झाला आहे.
शासनापुढे आव्हान
गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात साखरेचे उत्पादन भरमसाठ झाले होते, याठिकाणी गेल्यावर्षी 80 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामानाने महाराष्ट्रातील उत्पादन मात्र अगदी अल्प होते. यंदा मात्र उत्तरप्रदेशाला सुद्धा आपण मागे टाकणार आहोत. राज्यात ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेल्या साखरेचा स्टॉक करणे आता राज्य शासनापुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.