पुणे : यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, राज्यातील 194 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातील 32 कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. बुधवार अखेरीस (दि.31) 4.82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. राज्य सरकारने 20 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार साखर आयुक्तालयाकडे 100 सहकारी आणि 94 खासगी कारखान्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. राज्यात सरासरी हेक्टरी 88 टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल 116 टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी 952 लाख टन ऊस गाळपातून 107 लाख टन साखर उत्पादन झाले.
गाळपासाठी 941 लाख टन ऊस
निर्धारित केलेल्या साखर निर्यातीच्या लक्षानुसार सप्टेंबरअखेरपर्यंत किमान 20 लाख टन साखर निर्यात होणे अपेक्षित होते. मात्र, जुलै अखेरपर्यंत हा आकडा केवळ 3.5 लाख टन इतकाच होता. या वर्षीच्या (2018-19) हंगामातही 941 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन 106 ते 107 लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा उसाचे प्रमाण 60 टक्के असल्याने सरारी 90 टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच यंदाच्या हंगामात 11.62 लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण 2.60 लाख हेक्टरने अधिक आहे. 106 ते 107 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने आठशे ते साडेआठशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. त्यातून 90 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
194 कारखान्यांनी परवानगी मागितली
भोर, बारामती, इंदापूर या तालुक्यामधील 20 पैकी काही कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू करण्यात आले आहे. राज्यामध्ये मागच्या वर्षी 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तर सुमारे 1071 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. यंदा 194 साखर कारखान्यांनी ऊस गाळपाचे परवानगी सरकारकडे मागितली आहे. त्यापैकी 55 कारखान्यांना परवानगी मिळाली आहे. तर, 32 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे.
एफआरपी थकविलेल्यांचा परवाना रोखला
उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविलेल्या 29 कारखान्यांचा परवाना रोखला असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या आठ वर्षांपासूनची तब्बल 454 कोटी 85 लाख 42 हजार रुपयांची रक्कम थकीत आहे. यातील 221 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी गेल्या वर्षीच्या हंगामातील आहे.
3 लाख क्विंटल साखर
गेल्या 10 दिवसांमध्ये राज्यात 5 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यामधून सुमारे 3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, ऊस गाळप लांबल्यास त्याचा परिणाम राज्यातून परदेशात निर्यात होणार्या साखरेच्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाजिकच साखरेचे दरदेखील स्थिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.