शिक्रापूर । कोरेगाव-भिमा तालुका शिरूर येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीमध्ये अनेक जणांना इजा झाली आहे. कित्येक प्रवाशांचे नुकसानदेखील झाले. काही नागरिकांची वाहने जाळून खाक झाली आहेत. अशा प्रकारे भेदरलेल्या अवस्थेतील यवतमाळ येथील 37 बौद्ध अनुयायांना जातेगाव खुर्द ता. शिरूर येथील निकाळजे परिवाराने तीन दिवस आधार देत माणूसकीचे दर्शन घडविले आहे.
पेरणे फाटा येथे असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो बौद्ध अनुयायी येत असतात. त्याप्रमाणे यावर्षीदेखील लाखो अनुयायी आले होते. परंतु यावर्षी येथे समाजकंटकांनी बौद्ध बांधवांवर हल्ला केला. मोठ्या प्रमाणात दंगल, जाळपोळ, मोडतोड केली. हजारो नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले. याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण गावातील सुरेश थोरातांसह 37 बौद्ध अनुयायी येथे मानवंदना देण्यासाठी आले होते. यवतमाळपासून कोरेगाव भिमा हे अंतर 560 किलोमीटर असल्यामुळे सर्वजण 30 डिसेंबर रोजी यवतमाळ येथून निघाले होते. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे आल्यानंतर त्यांनी त्यांची दोन क्रुझर वाहने सकाळी पार्किंग केली. त्यानंतर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी गेले.
…आणि दंगल सुरू झाली
दरम्यान, सकाळी गोंधळ सुरु झाला आणि दंगल झाली. यावेळी सुरेश थोरात यांनी त्यांच्यासह असलेले उत्तम थोरात, संभाजी गडदने, ज्ञानरत्न थोरात, सुरेश कांबळे यांच्या मदतीने सर्व महिला मुलांना एकत्रित करून वाहनांकडे धाव घेतली. परंतु त्यावेळी दंगल सुरु असल्याने त्यांना वाहनांकडे जाता आले नाही. त्यांनी तेथेच मोकळ्या जागेमध्ये आसरा घेतला. एक तासाने पुन्हे वाहनांकडे जात असतानादेखील त्यांना वाहनांकडे जाता आले नाही. सर्वजण जीव मुठीत घेऊन मदतीची यातना करत होते. एक वाजण्याच्या दरम्यान जाळपोळ सुरु झाली. तेव्हा मात्र वरील सर्वजण घाबरून गेले. त्यांनी वाहनांकडे न जाता मिळेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वरील सर्वजण पिंपळे जगताप गावच्या हद्दीमध्ये आले. तेथे सर्वजण एका हॉटेलच्या आसर्याला थांबले. त्यांनतर सुरेश हे सर्व महिलांना तेथे थांबवून चारच्या दरम्यान काही दुचाकी वाहनांच्या मदतीने कोरेगाव भिमा येथे वाहनाजवळ गेले. तेव्हा त्यांची वाहने सुद्धा फोडलेली होती. त्यांनी व सचिन कांबळे यांनी त्यांची वाहने घेऊन ते सणसवाडी बाजूने निघाले. सणसवाडी येथेदेखील जाळपोळ सुरु असल्याने त्यांनी बेधरलेल्या अवस्थेत मिळेल त्या रस्त्याने पिंपळे जगताप गाठले.
निकाळजे मदतीला धावून आले
त्यांनी पुन्हा पिंपळे जगताप येथील एक हॉटेल गाठले. तेथून त्यांच्या काही नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला असता. यावेळी दूरच्या एका नातेवाईकाने जातेगाव खुर्द येथील प्रतीक्षा निकाळजे व बबुशा निकाळजे यांना फोनद्वारे सर्व माहिती दिली. प्रतीक्षा निकाळजे यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल गाठले. त्यावेळी येथे अडकलेल्या 37 अनुयायांना थोडा धीर आला. यानंतर निकाळजे यांनी चार पुरुष, पंचवीस महिला व सात मुलांना जातेगाव खुर्द येथील त्यांच्या घरी आणले. निकाळजेंनी जीव वाचविल्याने सर्व महिलांच्या डोळ्यात आश्रू आले. सर्वजण जेवण करून गप्पा मारण्यात रंगून गेले.