यशदा येथे प्रशिक्षणासाठी केवळ निम्मे सदस्य उपस्थित

0

जळगाव। जिल्हापरिषद सदस्यांना ग्रामीण विकासातील विविध कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी त्यांना कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात येते. मात्र या प्रशिक्षणास निम्मे सदस्यांनीच दांडी मारली आहे. पुणे येथे यशदा संस्थेतर्फे हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातुन 14 सदस्यांना पाठविण्यात येणार होते. मात्र प्रशिक्षणासाठी केवळ 7 सदस्य उपस्थित राहिले असून अन्य सदस्यांनी यास दांडी मारल्याची स्थिती आहे. उपस्थितांमध्ये पाच महिला सदस्यांचाच समावेश आहे.

राजीव गांधी पंचायत सक्षमीकरणा अंतर्गत नवनियुक्त राज्यातील जि.प.सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील 14 सदस्यांना पहिल्या टप्यात पाठविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र सात सदस्यच या प्रशिक्षणास उपस्थित असल्याची माहिती आहे. अनुपस्थितांमध्ये भडगाव, भुसावळ, अमळनेर तालुक्यांतील सदस्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी सदस्यांना बस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने अथवा रेल्वेने प्रवास खर्चाची मुभा दिली होती. यासह निवास, भोजनाचा खर्च हा यशदा संस्थेतर्फे केला जाणार आहे. मात्र असे असताना या प्रशिक्षणास सदस्यांची ना दिसुन आली. जि.प. तर्फे एप्रिल महिन्यात स्थानिक स्तरावर सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार होते, मात्र ते आजपर्यंत झाले नाही.