यशवंत जाधव यांच्याकडे स्थायी समितीची धुरा

0

मुंबई । मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. समिती अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे पिठासीन अधिकारी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचे घोषित केले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष बनून यशवंत जाधव यांनी महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत. या माध्यमातून तब्बल 15 वर्षांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा मान शहराला मिळाला आहे.

यशवंत जाधव यांची कारकीर्द
यशवंत जाधव हे मार्च 1997 मध्ये प्रथम निवडून आले होते. यामध्ये सन 2000-2001 या वर्षी त्यांनी स्थापत्य समिती अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते परत निवडून आले होते. या कालावधीत त्यांनी उद्यान आणि बाजार समिती अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडून आल्या होत्या. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंत जाधव हे निवडून आल्यावर त्यांची शिवसेना महापालिका गटनेतेपदी निवड झाली आणि ते सभागृहनेतेपदी विराजमान झाले होते.

आजवर स्थायी समिती अध्यक्ष बनून सभागृहनेते बनण्याची परंपरा होती. परंतु, यशवंत जाधव यांनी सभागृहनेते पदावरून स्थायी समिती अध्यक्ष बनण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यावर आपल्या भाषणात त्यांनी, महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मालमत्ता कर थकवल्यामुळे होणारी दंडात्मक आणि जप्तीच्या कारवाईचेही यशवंत जाधव यांनी समर्थन केले. कापडी पिशव्या बंद होत असल्याने यासाठी ज्यूट पिशव्यांचे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याची योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक हाऊस गल्ल्यांना पारदर्शक दरवाजे बसवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

विशाखा राऊत यांची कारकीर्द
विशाखा राऊत या सर्वप्रथम 1992 मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या, त्यानांतर 1997 मध्ये सलग दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर त्यांना महापौरपदाची बक्षिसी मिळाली, त्यानांतर दादर शिवाजी पार्क विभागामधून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर मधल्या काळात त्या कुठल्याही पदावर कार्यरत नव्हत्या. सन 2017 च्या पालिका निवडणुकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नीचे आव्हान परतवण्यासाठी त्यांना पुन्हा सेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पक्षाचा विश्‍वास सार्थ करत त्यांनी विजय खेचून आणला.

सभागृह नेतेपदावर विशाखा राऊत
यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सभागृहनेतेपद रिक्त झाले होते. या महत्त्वाच्या पदावर अत्यंत अनुभवी व्यक्तीची नेमणूक करणे क्रमप्राप्त होते. या पदासाठी तीन माजी महापौरांच्या नावाची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. यामध्ये मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव व विशाखा राऊत यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र, कालांतराने मिलिंद वैद्य यांचे नाव मागे पडून श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या दोन माजी महापौरांची नावे चर्चेत होते. मात्र, विशाखा राऊत यांना स्थायी समितीवर घेण्यात आले असल्याने सभागृह नेतेपदी त्यांची निवड होईल हे जवळ जवळ निश्‍चित होते.