देशात नाराजी, मला या सगळ्याचा वीट आला : सिन्हा
पटणा : माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा सिन्हा यांनी केली. येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.
देशात अस्थिरता निर्माण केली
पाटणा येथील कार्यक्रमात बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले, मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपसोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे. सध्याच्या सरकारने देशात अस्थिरता निर्माण केली आहे. जनतेच्या मनात या सरकारबाबत विश्वास उरलेला नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडून वारंवार होतो आहे. संसदेचे कामकाज विरोधकांकडून बंद केले जाते असा आरोप सत्ताधारी करतात पण एकदाही विरोधकांशी या विषयावर चर्चा करत नाहीत. हे सर्व अयोग्य आहे. देशाची लोकशाही आज धोक्यात आहे. देशात आज जे काही सुरू आहे, त्या विरोधात आपण उभे राहिलो नाही तर येणार्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असे यशवंत सिन्हा यांनी ठणकावले.
भाजपसाठी मोठा धक्का
2019 च्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना भाजपमधून यशवंत सिन्हा यांनी बाहेर पडणे हा पक्षासाठी खूप मोठा झटका आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. मात्र मोदी सरकारच्या काळात त्यांनी आपली नाराजी वारंवार व्यक्त केली. त्यांना काहीवेळा सत्तेतील मंत्र्यांनी प्रत्युत्तरे दिली. मात्र काही वेळा दुर्लक्ष केले. आता या सगळ्याला कंटाळून त्यांनी थेट पक्षाला रामराम केला आहे.
शत्रुघ्न सिन्हांच्या उपस्थितीत घोषणा
यशवंत सिन्हा यांनी 30 जानेवारीरोजी राष्ट्रमंच या बिगर राजकीय संघटनेची स्थापना केली होती. सरकारच्या अन्यायी धोरणांचा, निर्णयांचा पर्दाफाश करण्याचे काम ही संघटना करेल, असे त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून यशवंत सिन्हा हे भाजप सोडणार असल्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे. मात्र, कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, सिन्हा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली, तेव्हा भाजपचे आणखी एक नाराज नेते शत्रुघ्न सिन्हा हेही व्यसपीठावर उपस्थित होते.